PCMC Garden Maintenance Issues: पिंपरी-चिंचवडमधील उद्यानांची दुरवस्था; तुटलेल्या खेळण्यांनी मुलांचा हिरमोड

203 उद्यानांमध्ये खराब खेळणी, अपुऱ्या सुविधा; पालकांकडून संताप, वेळ वाढवण्याची मागणी
PCMC Garden Maintenance Issues
PCMC Garden Maintenance IssuesPudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल 203 सार्वजनिक उद्याने आहेत. बहुतांश उद्यानांतील खेळणी तुटलेल्या व खराब अवस्थेत आहेत. तुटलेली खेळणी पाहून बालगोपाळांचा हिरमोड होत असून, उन्हाळ्याच्या सुटीत मुलांनी खेळायचे कुठे, असा त्रस्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

PCMC Garden Maintenance Issues
PCMC Illegal Construction Action: पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईचे आदेश

महापालिकेचे शहरातील प्रत्येक भागांत आकर्षक व प्रशस्त अशी सार्वजनिक उद्याने तसेच, ऑक्सिजन पार्क आहेत. तेथे बालगोपाळांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांची खेळणी आहेत. व्यायामासाठी ओपन जीमचे साहित्य आहे. लोखंड, पत्रा आणि प्लास्टिकमधील ही खेळणी अनेक वर्षे झाल्याने तसेच, दुरुस्ती न केल्याने खराब झाली आहेत. खेळणी, झोके, रिंग, घसरगुंडी असे साहित्य तुटले आहेत. तर, काही गायब झाले आहेत. काही खेळण्यांचे भाग खराब झाले आहेत.

PCMC Garden Maintenance Issues
Chakan PMAY Site Theft: चाकणमध्ये पीएमएवाय साईटवर चोरी; 31 लाखांचा मुद्देमाल जप्त

उद्यानात बागडण्यासाठी आणि खेळण्यासाठी आलेली मुले त्या तुटक्या खेळण्यांसोबत खेळताना दिसतात. त्यामुळे दुर्घटना घडण्याचा धोका आहे. खेळणीचा फाटलेला व तुटलेला धारदार भाग मुलांना लागल्यास जखम होऊ शकते. तुटलेल्या घसरगुंडीतून मुले खाली पडू शकतात. अशीच स्थिती ओपन जीमची आहे. वेळोवेळी दुरुस्ती न केल्याने व्यायाम साहित्याचे पार्ट तुटलेले तसेच, निखळले आहेत. मुलांना तसेच, तरुण व नागरिकांना धोकादायक अवस्थेत व्यायाम करावा लागत आहे.

शाळांना उन्हाळी सुटी लागली आहे. त्यामुळे उद्यानात तोबा गर्दी होते. मात्र, खेळणी तुटलेली असल्याचे लक्षात येताच बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. सुस्थितीतील खेळणीवर खेळण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. खेळणी तुटलेली असल्याने बालगोपाळाच्या उत्साह मावळत आहे. या प्रकारामुळे पालक वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

PCMC Garden Maintenance Issues
YCM Hospital Nameboard Issue: वायसीएम रुग्णालयाचा नामफलक जीर्ण; ओळख पुसट

तिकीट काढूनही मनस्ताप

वीस ते साठ रुपयांचे तिकीट काढून नागरिक उद्यानात प्रवेश करतात. मात्र, तेथील खेळणी तुटलेली असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. स्वच्छतागृह तसेच, पिण्याची पाण्याची सुविधा सुमार दर्जाची आहे. झाडांचा पालापाचोळा, कचऱ्याचे ढीग जागोजागी दृष्टीस पडतात. प्रकाश व्यवस्था पुरेशी नसल्याने लहान मुले घाबतात. महिला व तरुणींसह ज्येष्ठांची गैरसोय होते. त्याचा गैरफायदा घेऊन प्रेमीयुगुल अंधारात बसलेले दिसून येतात. काही उद्यानात प्रेमीयुगुलाची संख्या मोठी असल्याने कुटुंबासह आलेल्या नागरिकांना विशेषत: महिलांची कुचंबणा होते. उद्यानात मोकाट कुत्र्यांचा वापर दिसून येतो. तसेच, काही उद्यानात विक्रेते खाद्यपदार्थ व खेळणी विकत फिरत असतात. परिणामी, सर्वत्र अस्वच्छता दिसून येते.

वेळ वाढवण्याची मागणी

सध्या उन्हाची तीव्र लाट आहे. सायंकाळी साडेपाचपर्यंत उन्ह कडक असते. त्यामुळे उद्यानात साडेपाचनंतर नागरिकांची गर्दी होते. एक कुटुंब सुमारे 150 ते 200 रुपये खर्च करून उद्यानाचे प्रवेश तिकीट खरेदी करते. मात्र, उद्यान रात्री आठला बंद केले जाते. आठनंतर लगेच सर्व दिवे बंद केले जातात. नागरिकांना अक्षरश: उद्यानातून हाकलून लावले जाते. केवळ दीड ते दोन तास उद्यानात बागण्यासाठी तसेच, खेळण्यासाठी मिळतात. त्यामुळे नागरिकांसह बालगोपाळांचा हिरमोड होत आहे. उष्णतेची सद्यस्थिती लक्षात घेऊन उद्यानाची वेळ रात्री नऊ किंवा दहापर्यंत वाढविण्याची मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

PCMC Garden Maintenance Issues
Pimpri World Malaria Day Awareness: पिंपरीत हिवताप दिनानिमित्त प्रभात फेरी; मलेरिया प्रतिबंधाची जनजागृती

दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

उद्यानातील खेळणी तसेच, ओपन जीमचे साहित्य दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्या संदर्भात नागरिकांसह नगरसेवकांनी सातत्याने तक्रारी केल्या आहेत. त्या संदर्भात दैनिक पुढारीने सातत्याने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचे रोष व्यक्त केला जात आहे.

तुटलेल्या खेळणीसोबत खेळणे धोकादायक

महापालिकेच्या पिंपळे गुरव येथील 8 टू 80 पार्कमधील ओपन जीमचे साहित्य तुटले आहे. वारंवार दुरूस्त करूनही ते साहित्य टिकत नाही. उद्यानात सुशोभिकरण खराब झाले आहे. तसेच, राजमाता जिजाऊ (डॉयनोसार) उद्यानात प्रकाश व्यवस्था अपुरी आहे. काही भागात अंधार असल्याने मुले व महिला घाबरतात. खेळणीची संख्या अपुरी आहे. तुटलेल्या खेळणीवर मुले खेळत असल्याने ते जखमी होऊ शकतात, असे माया भोसले यांनी सांगितले.

खेळणी दुरुस्ती कामाची निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात

उद्यानातील खेळणी व ओपन जीमचे साहित्य दुरूस्ती व देखभालीबाबत प्रशासन गंभीर आहे. त्या कामाची निविदा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ती प्रक्रिया पूर्ण करून सर्व उद्यानांतील नादुरुस्त खेळणी व जीमचे साहित्य दुरूस्त केले जाईल. अपुरा प्रकाश व्यवस्था असलेल्या उद्यानात पुरेशा प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे. तिकीट असलेल्या उद्यानाची वेळ वाढविण्याची मागणी झाल्यास विचार केला जाईल, असे महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news