

पिंपरी: चाकण परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकाम साईटवरून ॲल्युमिनियम प्लेट चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. 10 ते 16 एप्रिलदरम्यान राक्षेवाडी येथे ही चोरी झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या प्लेटसह एकूण 31 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रामरक्षा उर्फ राजू धर्मराज पासवान (40, रा. सुसगाव, ता. मुळशी), स्वराज शांताराम कालापाड (23), स्वप्नील शांताराम कालापाड (25), अक्रम रफिकउल्ला खान (28, तिघेही रा. येलवाडी, ता. खेड, जि. पुणे) आणि अतुल संभाजी सोनवणे (33, रा. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उत्तर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी 20 लाख रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम सेट्रींग प्लेटची चोरी केली होती. तपासादरम्यान घटनास्थळाजवळ एक बेवारस मोटारसायकल मिळाली.
त्याच्या आधारे तांत्रिक तपास करण्यात आला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. यावरून आरोपींचा माग काढण्यात यश आले. चौकशीत आरोपींनी चोरीचा मुद्देमाल विक्री केल्याची कबुली दिली. कात्रज येथील भंगार विक्रेत्याला हा माल विकण्यात आला होता. त्यानंतर हा माल पुढे चाकण आणि शिक्रापूर येथे विक्रीस काढण्यात आला.
या साखळीचा तपास करत पोलिसांनी चोरीस गेलेल्या 20 लाखांच्या प्लेटसह दोन दुचाकी आणि टेम्पोसह एकूण 31 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील दोन परराज्यातील आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
..यांनी केली कामगिरी
पोलिस उपायुक्त मारुती जगताप, सहायक पोलिस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे यांनी तपास केला. तसेच या कारवाईत पोलिस हवालदार यादव, ढमढेरे यांनी सहभाग नोंदवत महत्त्वाची कामगिरी बजावली.