

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जानेवारी 2026 होणार आहे. त्यानिमित्ताने माजी नगरसेवक तसेच, इच्छुकांनी शहरभरात विनापरवाना फ्लेक्स, किऑक्स व पोस्टर्स लावून शहर विद्रुप केले आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या पथकांनी शहभरात धडक कारवाई करीत एका दिवसात 724 फ्लेक्स व किऑक्स जप्त केले आहेत. तसेच, एकूण 1 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना फ्लेक्स, किऑक्स, पोस्टर्स तसेच, होर्डिग लागले आहेत. फ्लेक्स लावण्यासाठी इच्छुकांची चढाओढ दिसत आहे. चौक, बाजारपेठ, मंडई, उद्यान अशा वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने फ्लेक्स लावण्यात येत आहेत. जागा मिळेल तेथे फ्लेक्स लावले जात आहेत.
विद्युत प्रकाशाचे खांब, झाड, सिग्नलचे खांब, बॅरिकेट्स, सीमाभिंत, कठडे आदी ठिकाणी धोकादायकरित्या फ्लेक्स लावले गेले आहेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
अशा फ्लेक्स, किऑक्स व होर्डिंगवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. त्यानुसार, आकाशचिन्ह व परवाना विभागाने मंगळवारी (दि.9) दिवसभरात धडक कारवाई मोहीम राबविली.
आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयातील पथकांनी धडक कारवाई करीत एकूण 724 फ्लेक्स व किऑक्स जप्त केले. तसेच, नागरिक, संस्था, दुकानदार, व्यावसायिक यांच्याकडून एकूण 1 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.