

नवी सांगवी: शहरातील कलाकारांच्या गुणांना वाव मिळावा व रसिकांना अभिनयाचा आनंद लुटता यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने नवी सांगवी येथे नटसमाट निळू फुले नाट्यगृह उभारले आहे. येथील निळू फुले नाट्यगृह चक्क मार्च 2026 अखेरपर्यंत हाऊसफुल्ल झाले आहे. शाळांचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यासाठी मराठी, इंग््राजी माध्यमांच्या शाळा येथील नाट्यगृहात धाव घेत आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार मार्च अखेरपर्यंतच्या तारखा बुकिंग झाल्या आहेत.
सोमवार ते गुरुवारदेखील मोठ्या प्रमाणात शाळांनी बुकिंग केलेले आहे. मोजकेच सणवारांचे दिवस सोडले तर नाट्यगृह बुक झाल्याचे येथील व्यवस्थापक दिगंबर वाघेरे यांनी याप्रसंगी माहिती देताना सांगितले. नोव्हेंबर महिन्यापासून शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा धडाका निळू फुले येथील नाट्यगृहात सुरू आहे. अनेक शाळा सरावासाठीदेखील बुकिंग करीत आहेत. येथे नाटकांचे प्रयोग कमी मात्र, बाराही महिने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते.
1 एप्रिल ते 8 डिसेंबर 2025 पर्यंत तब्बल 43 लाख 19 हजार 163 रुपये (अंदाजे उत्पन्न) महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. नाट्यगृहात सुसज्ज रंगमंच, पार्किंग सोय, विद्युत व्यवस्था, वातानुकूलित हॉल व इतर सर्व सुविधांनी सुसज्ज, असे प्रेक्षागृह रसिकांना सतत भुरळ घालत आहे. येथील नाट्यगृह सांगवी, पिंपळे गुरव पुरते मर्यादित न राहता औंध, बाणेर, पाषाण, चतुशृंगी, वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, कासारवाडी, दापोडी आदी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालये सुशिक्षित आणि सांस्कृतिक वसा लागलेली उपनगरे असल्याने येथील निळू फुले नाट्यगृहाला अधिक पसंती देत आहेत.
नाट्यगृहात 389 तर बाल्कनीमध्ये 169 खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. लिफ्टची सोय, महापालिकेचे 1 व्यवस्थापक, 1 क्लार्क, 7 कर्मचारी कार्यरत आहेत. 14 खासगी कर्मचारी व 6 खासगी सुरक्षारक्षक आहेत. पार्किंग सोय उपलब्ध आहे. याठिकाणी आधुनिक सर्व सुखसोयी उपलब्ध आहे.
जुलै ते डिसेंबर 2025 मध्ये ऑनलाईन प्रक्रियेनुसार 28 लाख 40 हजार 328 रुपये रकमेची तिजोरीत भर पडली आहे. त्यामुळे 1 एप्रिल ते 7 डिसेंबरअखेर एकूण 43 लाख 19 हजार 163 रुपये इतकी रक्कम जमा झालेली आहे. अजूनही उरलेल्या तारखांचे ऑनलाईन बुकिंग नागरिक करीत आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या संख्येत आणि रकमेत आणखी भर पडण्यास मदत मिळत आहे.
स्नेहसंमेलनासाठीचे बुकिंग
डिसेंबर ते फेबुवारीपर्यंत नाट्यगृहामध्ये स्नेहसंमेलनासाठी बुक केलेल्या कार्यक्रमाची संख्या पुढीलप्रमाणे डिसेंबरमध्ये 32, जानेवारीमध्ये 25, फेबुवारीमध्ये 20, मार्चमध्ये 13 कार्यक्रम बुक झाले आहेत.
नोव्हेंबर ते मार्चअखेर या पाच महिन्यांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनामुळे शाळा आणि महाविद्यालय नाट्यगृहाच्या तारखा बुकिंग करीत असतात. दुसऱ्या मजल्यावर येथे बहुउद्देशीय सभागृहदेखील आहे. यात दोनशे लोक बसू शकतील एवढी आसन क्षमता असून, 3 तासाला येथे 5 हजार 183 रुपये भाडे आकारले जाते. यावर्षी मात्र वर्षाच्या सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रेलचेल सुरू आहे. येथे कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस व वैयक्तिक कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही.
दिगंबर वाघेरे, नाट्यगृह व्यवस्थापक