

संतोष शिंदे
पिंपरी: नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरण ताजे असतानाच पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात एका सुरक्षा रक्षकाने सोसायटीतील चिमुकल्या मुलींशी गैरकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरातील सोसायट्यांमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या पडताळणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मोशीतील परिसरातील एका हौसिंग सोसायटीमध्ये काम करणारा सुरक्षा रक्षकाने सोसायटीतील तीन लहान मुलींना पाण्याची टाकी दाखवण्याच्या बहाण्याने टेरेसवर नेले. त्यानंतर त्याने 10 वर्षीय मुलीच्या गालांना व ओठांना स्पर्श केला. दुसऱ्या एका आठ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केले; तसेच कोणाला सांगितले तर मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आणखी एका मुलीच्या गळ्याला हात लावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर संबंधित मुलींनी घाबरलेल्या अवस्थेत पालकांना माहिती दिली. त्यानंतर सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. रहिवाशांनी तातडीने सुरक्षा रक्षकाला जाब विचारत पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकारामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी मोकळेपणाने खाली पाठवतानाही पालकांमध्ये धाकधूक निर्माण होत असल्याचे चित्र आहे. अनेक रहिवाशांनी सोसायटीतील सुरक्षाव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत एजन्सीकडून नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे.
पोलिस पडताळणीची गरज
मोशीतील घटनेनंतर सुरक्षा रक्षकांची पोलिस पडताळणी बंधनकारक असावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सोसायट्यांनी एजन्सी निवडताना संबंधित रक्षकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, ओळखपत्रे, राहण्याचा पत्ता आणि पोलिस पडताळणीची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करताना केवळ आधारकार्ड किंवा मोबाईल क्रमांकावर प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे समोर येत आहे.
पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्याची मागणी
शहरातील सर्व खासगी सुरक्षा रक्षकांची पोलिस पडताळणी झाली आहे का, याची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवण्याची गरज आहे. तसेच, विनापडताळणी सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे. संबंधित एजन्सींचे परवाने, नोंदणी आणि कामकाजाची पद्धत तपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पूर्वीही उघड झाले प्रकार
पिंपरी-चिंचवड शहरात यापूर्वीही सुरक्षा रक्षकांकडून चोरी, महिलांची छेडछाड, सोसायटीतील अल्पवयीन मुलींचा विनयभंग तसेच कंपनीतील साहित्य चोरीसारखे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. रहिवाशांच्या दैनंदिन सुरक्षेशी संबंधित जबाबदारी सांभाळणाऱ्या एजन्सी आणि व्यक्तींची निवड करताना अधिक काटेकोर निकष लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
मोशीतील प्रकाराने पुन्हा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
निगडीतील सोसायटीतील सुरक्षारक्षक कोट्यवधी रुपयांचा ऐवज घेऊन फरार.
कंपनीतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने पाच लॅपटॉपची चोरी.
एमआयडीसी भोसरी परिसरातील कंपनीतून दीड लाखांचे साहित्य लंपास.
पिंपरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग.
चिंचवडमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार.
वाकडच्या मॉलमध्ये सहकारी महिला रक्षकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न.
हिंजवडीत झोपेच्या गोळ्या घेतलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न.
कुंपणच शेत खात असल्याची भावना
शहरात मोठ्या प्रमाणावर उभारल्या जाणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये खासगी सुरक्षा एजन्सीमार्फत रक्षक नेमले जातात. मात्र, अनेक ठिकाणी अपुरी माहिती, कागदपत्रांची ढोबळ तपासणी आणि कमी मनुष्यबळ यामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्रुटी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी एकाच रक्षकाकडून सलग दोन पाळ्यांमध्ये काम करून घेतले जाते. त्यामुळे निष्काळजीपणा वाढत असून रहिवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
सुरक्षारक्षकाकडून तीन चिमुरड्यांचा विनयभंग
मोशी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकानेच तीन अल्पवयीन मुलींना पाण्याची टाकी दाखवण्याचे आमिष दाखवत सातव्या मजल्यावर नेऊन त्यांच्याशी अलील चाळे केले. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिनेश बाबूराम चौधरी (25, सध्या रा. मोशी, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. 8) दुपारच्या सुमारास सोसायटी परिसरात शांतता असताना आरोपीने तीन अल्पवयीन मुलींना गाठले. ‘तुम्हांला टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो’, असे सांगून त्याने मुलींना बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर नेले. तेथे त्याने मुलींशी अलील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने मुलींना दिली होती. त्यामुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या; मात्र त्यातील एका 10 वर्षीय चिमुरडीने धैर्य दाखवत घरी पोहोचल्यानंतर आईला संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीच्या प्रसंगावधानामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला. पालकांनी तातडीने एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करत आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीचा त्या सोसायटीतील कामाचा तो पहिलाच दिवस असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी तो एका सिक्युरिटी एजन्सीत कार्यरत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोसायटीच्या सुरक्षिततेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडूनच असे कृत्य घडल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंग तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करत आहेत.
गृहनिर्माण सोसायट्या, व्यापारी संकुले तसेच विविध आस्थापनांनी खासगी सुरक्षा एजन्सी नियुक्त करताना आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. संबंधित सुरक्षा एजन्सी शासनमान्य व परवानाधारक असावी. तसेच, एजन्सीकडे कार्यरत असलेल्या प्रत्येक सुरक्षा रक्षकाची पोलिस पडताळणी, ओळखपत्रांची खातरजमा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी झालेली असणे आवश्यक आहे. एजन्सीधारकांनी कोणतीही पडताळणी न करता सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे टाळावे.
सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड