

वडगाव मावळ: मला फक्त आमदार द्या, तुम्हाला हवा तितका निधी देतो, असे वारंवार आवाहन करत मावळात राष्ट्रवादीचा आमदार करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि मावळच्या विकासासाठी पाच वर्षांत तब्बल 5 हजार कोटींचा निधी देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्दही पाळला. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह विकासकामांना निधी देऊन मावळचा चेहरामोहरा बदलण्याचे काम दादांनी केले.
मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये सन 1995 मध्ये सत्तांतर झाले. स्व. रूपलेखा ढोरे यांच्या माध्यमातून मावळात भाजपच्या पहिला आमदार झाल्या. तेव्हापासून सन 2019 पर्यंत म्हणजे तब्बल 25 वर्षे मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता अबाधित राहिली. दरम्यान, सन 1999 ला राष्ट्रवादी काँग््रेासची स्थापना झाली. तेव्हापासून अजित पवार हे मला फक्त पक्षाचा आमदार द्या मी तुम्हाला हवा तितका निधी देतो, असे वारंवार सांगत होते. मावळात राष्ट्रवादीचा आमदार व्हावा हे त्यांचे स्वप्न होते.
अखेर सन 2019 मध्ये सुनील शेळके यांच्या रूपाने मावळात राष्ट्रवादीला आमदार मिळाला आणि दादांचे स्वप्न पूर्ण झाले. त्या पंचवार्षिक काळात पहिली दोन वर्षे कोरोना संकटात गेली. काही काळ विरोधात बसावे लागले. तरीही दादांनी आमदार शेळके यांनी सुचवलेल्या सर्व महत्त्वपूर्ण प्रकल्पांना व विकासकामांना मंजुरी देत जवळपास 5 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आणि मावळच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला.
यामध्ये वडगाव मावळ येथील भव्य प्रशासकीय इमारत, पोलिस ठाणे, लोणावळा व कान्हे फाटा येथे दोन उपजिल्हा रुग्णालय, अंदर मावळसाठी सुमारे 40 किलोमीटर अंतर रस्त्याचे काँक्रिटीकरण, वडेश्वर येथील आदिवासी विद्यार्थी आश्रम शाळेची नूतन इमारत, तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालयांच्या इमारती, जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना अशा असंख्य कामांचा समावेश असून, संबंधित कामे त्यांच्या डोळ्यांदेखत पूर्ण झाली आहेत.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ तालुक्यावर विशेष प्रेम केले. गेल्या सहा वर्षांत सुमारे 5 हजार कोटींचा निधी देऊन मावळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम दादांनी केले. त्यामुळे दादांच्या मृत्यूच्या घटनेने संपूर्ण मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, लोणावळा, कामशेत, पवनानगर येथील नागरिकांनी बाजारपेठा बंद ठेवून शोक व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादी काँग््रेाससह तालुक्यातील भाजपा, शिवसेना, काँग््रेास, मनसे, रिपाइं, स्वाभिमानी रिपाइं, वंचित आघाडी अशा सर्वच पक्षांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे.
ग्लास स्काय वॉक, संतभूमी कॉरिडॉर, एकवीरा देवी रोपवे, क्रीडासंकुल पाहण्याचे दादांचे स्वप्न अधुरे!
दादांनी मंजुरी दिलेल्या प्रमुख कामांमध्ये दोन उपजिल्हा रुग्णालये, प्रशासकीय इमारत, तळेगाव दाभाडे नगर परिषद इमारत, वडगाव पोलिस ठाणे इमारत, आदिवासी आश्रमशाळा आदी कामे त्यांच्या डोळ्यादेखत पूर्ण झाली. परंतु, त्यांनीच मंजुरी दिलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये लोणावळा येथील ग्लास स्काय वॉक प्रकल्प, एकवीरा देवी येथील रोपवे, कुंडमळा येथील पर्यटनदृष्ट्या पुलाची उभारणी, तळेगाव ते चाकण रस्ता, कान्हे फाटा येथील रेल्वे उड्डाणपूल अशी महत्वाची कामे अजून प्रलंबित आहेत. तसेच श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला संतभूमी कॉरिडॉर उभारण्याचे व तालुक्यासाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे दादांचे स्वप्न मात्र अधुरे राहिले.
माय भगिनींसोबत पंगतीत जेऊन त्यांनी मावळातील शेवटचा पाहुणचार घेतला!
मावळात 25 वर्षे पक्षाचा आमदार नव्हता, तरीही दादांचे मावळ तालुक्यावर विशेष प्रेम होते. तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांवर त्यांचा जीव होता. निवडणूक असो किंवा कोणताही पक्षाचा अथवा खासगी कार्यक्रम असो, दादा मावळात यायचेच. सहा वर्षांपूर्वी आमदार सुनील शेळके यांच्या रूपाने दादांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतर मात्र दादा मोठ्या अभिमानाने मावळात येत होते. परंतु, 4 जानेवारीला झालेला दादांचा दौरा हा अनोखाच ठरला. ते आमदार शेळके यांनी आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाला गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच आले. आमदार शेळके यांनी दादांना फक्त जेवण करून जावे, अशी विनंती केली. दादांनीही ती मान्य करत उपस्थित असलेल्या माय बहिणींसोबत मांडी घालून जमिनीवर बसून पत्रावळीमध्ये भात, आमटी, शेक भाजी, बुंदी असा महाप्रसादाचा लाभ घेतला आणि हाच त्यांचा मावळ तालुक्यातील शेवटचा पाहुणचार ठरला.