

चऱ्होली: पिंपरी-चिंचवड महापालिकेत चऱ्होलीचा समावेश झाल्यानंतर बरेच वर्ष येथे विकासाची गंगा आली नव्हती; परंतु मागील काही वर्षांत येथे प्रशस्त रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यातील काही रस्ते पूर्ण झाले, तर काही रस्ते अद्याप अर्धवट आहेत. बहुतांश अंतर्गत रस्ते अर्धवट असल्याने चऱ्होलीतील नागरिक, वाहनचालक यांना त्रास सहन करावा लागत आहे. तनिष सोसायटीजवळील 18 मीटर रस्ता अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अर्धवट रस्त्याचा वापर होत नसल्याने पदपथावर मोठ्या प्रमाणात गवत तसेच दारूच्या बॉटल दिसून येत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एअरपोर्ट रोडला समांतर असणारा आणि तनिष अर्चिड, तनिष पर्ल या सोसायटीच्या बरोबर मागील बाजूस असणारा रस्ता अर्धवट आहे. या अर्धवट रस्त्याचा फायदा घेऊन मद्यपी रात्री येथे दारू पिण्यास बसत आहेत. हा रस्ता काही प्रमाणात वापरात आहे; परंतु काही रस्ता वापराविना पडून आहे. या भागात मद्यपी पार्ट्या करतात. परंतु, याकडे पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने परिसरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याने जरी मोठी वाहतूक होत नसेल तरी येथे राहणारे नागरिकांना मात्र त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महापालिकेने रस्त्याची परवानगी घेऊनच रस्ता निर्माण करणे गरजेचे होते. मात्र, अतिघाई केल्यामुळे रस्ताचे काम तर सुरू केले; परंतु अद्याप महापालिकेला रस्ता पूर्ण करता आला नाही. रस्त्याचे काम अर्धवट झाल्यामुळे या रस्त्यावरून कोणत्याही स्वरूपाची मोठी वाहतूक करणे शक्य नाही. त्यामुळे पूर्ण दळणवळणाच्या दृष्टीने या रस्त्याचा उपयोग नाही मात्र तरीही रस्त्यासाठी झालेला खर्च दुर्लक्षित करता येणार नाही.
पदपथावर कचऱ्याचे सामाज्य
या अंतर्गत रस्त्यांच्या आजूबाजूला जे नागरिक राहतात त्यांना या रस्त्यावरील पदपथाचा काहीच उपयोग करता येत नाही. कारण हा संपूर्ण पदपथ गवताने व्यापलेला आहे. बरेच दिवसांपासून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी पदपथ आहे की नाही, हेच समजत नाही. या रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होऊन आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या फक्त मुख्य रस्त्यावरील कचरा उचलतात मात्र अंतर्गत रस्त्यावरील कचऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते.
पथदिवे बंद, मद्यपींचा उच्छाद
या रस्त्यांवरून फारशी वर्दळ नसल्यामुळे या रस्त्यावरील सर्व पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेला या ठिकाणी संपूर्ण अंधार असतो. या अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणी मद्यपींचे अड्डे बसलेले असतात. येथे ठिकठिकाणी सिगरेटची थोटके, दारूच्या आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या रस्त्याच्या कडेलाच टाकून दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या पिशव्या देखील आजूबाजूला दिसून येतात.
मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना त्रास
हा रस्ता शांत असल्यामुळे या ठिकाणी आजूबाजूच्या सोसायटीतील नागरिक सकाळच्या वेळेला व्यायामासाठी, मॉर्निंग वॉकसाठी येतात. याशिवाय रात्री जेवण झाल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी, फिरण्यासाठीदेखील नागरिक या रस्त्यावर येत असतात. मात्र या ठिकाणच्या या सगळ्या अव्यवस्थेमुळे व मद्यपीमुळे आणि अस्वच्छतेमुळे नागरिक पूर्ण त्रासलेले आहेत.
मूळ जागा मालकांकडून जागेचा ताबा मिळाला नसल्याने पूर्ण रस्ता होऊ शकला नाही. ज्या वेळी ताबा मिळेल त्यानंतर पूर्ण रस्ता केला जाईल.
अमित चव्हाण, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य विभाग
या अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. पदपथावर गवत आणि कचरा साचलेला आहे. त्यामुळे हा परिसर स्वच्छ करणे गरजेचे आहे.
प्रवीण काळजे, मा. संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना
या रस्त्यावरील पदपथांची स्वच्छता करण्याबाबत नागरिकांची बरेच दिवसांपासून मागणी आहे. अधिकाऱ्यांशी बोलून लवकरच हा परिसर स्वच्छ करण्यात येईल. परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
सचिन तापकीर, नगरसेवक, मनपा
उद्या सकाळीच या रस्त्यावरील सर्व कचरा, गवत काढण्यात येईल. रस्त्यावरील सर्व प्लास्टिक बाटल्या उचलून सर्व पदपथ नागरिकांसाठी स्वच्छ केला जाईल.
वैभव कांचनगौडा, कनिष्ठ अभियंता, पर्यावरण विभाग