

लोणावळा: लोणावळा शहरातील नांगरगाव येथे लाईटच्या खांबांना अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्यामुळे श्री स्वामी समर्थ जनकल्याण केंद्रासमोरील चार खांब पडले आहेत. त्यामुळे या सर्व भागातील वीजपुरवठा मध्यरात्रीपासून खंडित झाला आहे. अपघाताची व लाईटचे खांब पडल्याची माहिती लोणावळा वीज वितरण कार्यालयाला समजल्यानंतर त्यांनी तात्काळ आपले कर्मचारी घटनास्थळी पाठवत या भागातील वीजपुरवठा बंद केला व रस्त्यावर पडलेले खांब व लाईटच्या तारा बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
खांब पडल्यामुळे नांगरगाव व वलवन या परिसरामधील काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला असून, उर्वरित ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाहून वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी वीज वितरण कार्यालयाकडून अतिरिक्त कामगारांची टीम बोलवत दुपारपर्यंत सर्व खांब उभे करण्यात आले. त्यानंतर, या सर्व कामांवरील तुटलेल्या तारा नवीन बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
लघु दाबाच्या दोन व मध्यम दाबाच्या दोन लाईन या दुर्घटनेमध्ये बाधित झाल्या होत्या. हे सर्व काम रात्री उशिरापर्यंत पूर्ण होईल असे वीज वितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या भागातील नगरसेवक सुभाष डेनकर यांनी घटनास्थळी भेट देत कामाचा आढावा घेतला. तसेच नांगरगाव भागातील इतर ठिकाणचेदेखील जीर्ण व वाकलेले काम बदलण्याची तसेच खराब झालेल्या डीपी दुरुस्त करण्याची मागणी वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.