

लोणावळा: 31 डिसेंबर पूर्वी आलेला या वर्षातील शेवटचा शनिवार व रविवार साजरा करण्यासाठी व ख्रिसमस सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाल्याने सर्वत्र मोठी वाहतूककोंडी झाली आहे. मुख्य रस्त्यांसह सर्वच रस्त्यांवर वाहनाची गर्दी झाल्याने सर्वत्र कोंडी झाली होती. त्यामुळे पर्यकांप्रमाणे स्थानिक नागरिकांनादेखील या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.
वाहनचालक त्रस्त
गुरुवारी ख्रिसमसची सुटी व त्याला जोडूनच लाँग विकेंड आल्यामुळे ही गर्दी झाली असल्याचे सांगितले जात आहे. अनेक शाळा व महाविद्यालयांना सुट्या आहेत. ख्रिसमस व न्यू इयर या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक हे पर्यटनस्थळांवर जाण्यास निघाले आहेत. त्यामध्ये लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, कोल्हापूर, पन्हाळा तसेच पश्चिम महाराष्ट्र मार्गे गोवा व कोकण परिसरामध्ये अनेक पर्यटक खासगी वाहनांमधून जाऊ लागले आहेत. आज सकाळपासूनच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पर्यटकांच्या या खासगी वाहनांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.
पर्यटक अडकले कोंडीत
खंडाळा घाट ते खालापूर टोलनाकादरम्यान ही वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वास्तविक पाहता दर शनिवार रविवारी व सलग सुट्यांच्या कालावधीमध्ये खंडाळा घाट परिसरामध्ये वाहतूककोंडीही होत असते. पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करून घराबाहेर पडलेल्या पर्यटकांना या वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. विशेषतः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तासंतास अडकून पडलेल्या पर्यटकांना याचा सर्वांधिक त्रास सहन करावा लागला. दुपारच्या वेळेमध्ये अनेक वाहने गरम होऊन बंददेखील पडत होती. वाहनांमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची अडचण ही जाणवत होती. लोणावळ्यातदेखील खंडाळा ते लोणावळा व पुढे कार्ला ते लोणावळा दरम्यान मोठी वाहतूककोंडी झाली होती.
महामार्गावर वाहनांच्या रांगा
या न्यू इयरच्या स्वागतसाठी मुंबईकर पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनस्थळे जाण्यासाठी निघाल्यामुळे आज मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. खंडाळा घाट परिसरामध्ये साधारणता: आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबा लागून द्रुतगती महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांचे प्रयत्न अपुरे
खंडाळा घाट परिसरामधील ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिस प्रयत्न करत होते. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी ब्लॉक घेऊन सर्व लेन खुल्या केल्या जात होत्या. मात्र, कोंडी कमी होण्याचे नाव घेत नव्हते. वाहनांच्या वाढलेल्या संख्येपुढे पोलिसांचे प्रयत्नदेखील अपुरे पडत होते. लोणावळा शहरामध्ये मागील चार दिवसांपासून वाहतूककोंडी झाली आहे. पुढील आठवडाभर अशीच परिस्थिती मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असणार आहे. पर्यटनस्थळांवर देखील पर्यटकांची गर्दी होत आहे. सायंकाळच्या सुमारास सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. लोणावळा शहर व परिसरातील बहुतांश हॉटेल्स तसेच खासगी बंगलोज व फार्म हाऊस यांच्या बुकिंग पूर्ण झाले असून, या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले.