

लोणावळा: आम्हाला स्मार्ट मीटर नको, तर पूर्ण वेळ वीज द्या, चांगल्या सुविधा द्या, मागील अनेक वर्षांपासून रखडलेला भूमिगत केबल प्रकल्प पूर्ण करून शहरातील तारांचे जाळे काढून टाका, सब स्टेशन उभारत विजेचा लपंडाव बंद करा, अशा विविध मागण्या नागरिकांनी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीकडे केल्या आहेत.
वीजबिलात तफावत
मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीकडून ग्राहकांची कोणतीही परवानगी न घेता अथवा कोणतीही कल्पना न देता परस्पर अनेक ठिकाणचे मीटर बदलत त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावले आहेत. स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याचा आरोप ग्राहक करत आहेत. मात्र, या तक्रारी व आरोपांची कोणतीही शहनिशा केली जात नसून, त्यामधील तथ्यदेखील तपासले जात नाही. त्यामुळे लोणावळा शहरामध्ये या स्मार्ट मीटरच्याविरोधामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
विविध राजकीय पक्षांनी या विरोधामध्ये महाराष्ट्र वीज वितरण कार्यालयाच्याविरोधामध्ये आंदोलन केले. निषेध मोर्चा काढला, लोणावळा शहर कडकडीत बंद पाळत महावितरणचा निषेध नोंदविण्यात आला. असे असले तरीही स्मार्ट मीटरबाबत कोणते ठोस आश्वासन लोणावळाकरांना मिळालेले नाही. ग्राहकांना कल्पना देऊन मीटर बदलले जाईल एवढे मात्र अधिकारी सांगत आहेत. मात्र, त्यावर राजकीय पक्ष समाधानी नाहीत. ग्राहकांची मान्यता असेल तरच मीटर बदला अन्यथा स्मार्ट मीटर फोडले जातील व महावितरणच्या विरोधामध्ये यापेक्षादेखील अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा सर्व राजकीय पक्षांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे.
खराब विद्युत खांब बदला
2010 या वर्षापासून शहरामध्ये भूमिगत केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, ते काम अद्यापपर्यंत पूर्ण का झाले नाही. लवकरात लवकर भूमिगत केबल टाकत शहरातील तारांचे जाळे काढण्यात यावे, खराब झालेले खांब, डीपी व तारा बदलून नवीन लावण्यात याव्यात, दिवसातून सहा ते आठ वेळा किमान लाईट जाण्याच्या घटना घडतात हे बंद करावे व लोणावळा शहराला पूर्णवेळ अखंडितपणे वीजपुरवठा करावा, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे
अनेक वेळा दिवसभर वीज जाते. महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर फोन उचलला जात नाही. फोन उचलला तरी योग्य प्रकारे उत्तरे दिली जात नाहीत. अशा एक ना अनेक समस्या या आंदोलनादरम्यान नागरिकांनी मांडल्या आहेत. स्मार्ट मीटरचा घाट घालणाऱ्या महावितरण कंपनीने पहिला आपला कारभार सुधारावा, ग्राहकांना चांगल्या सुविधा द्याव्यात, पूर्ण वेळ वीजपुरवठा करावा, अशी मागणी सर्वपक्षीयांनी व व्यापारी संघटनेने केली आहे. या प्रश्नांकडे मात्र अधिकारी सोयस्कररित्या कानाडोळा करतात व प्रस्ताव पाठवला आहे एवढेच साचेबद्ध उत्तर दिले जाते. 2010 ते 2026 या सोळा वर्षांमध्ये केवळ प्रस्ताव पाठवण्याचे कामच महावितरण कंपनीने केली आहे. सोळा वर्षांमध्ये एकही मागणी पूर्ण झालेली नसून, नागरिक जो त्रास भोगत आहेत तो आजही सहन करावा लागतो आहे. महाराष्ट्र शासनाने व महावितरण कंपनीने याची दखल घ्यावी व लोणावळासारख्या पर्यटनस्थळाला अखंडितपणे वीजपुरवठा कसा होईल, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या आंदोलनानिमित्त नागरिकांनी केली आहे.
शहरामध्ये सब स्टेशन उभारण्याकडे दुर्लक्ष
महावितरणच्याविरोधामध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने शहरांमध्ये सातत्याने सुरू असलेला विजेचा लपंडाव हा मुद्दादेखील अग्रभागी होता. लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असून, या ठिकाणी लाखो पर्यटक येत असतात. पर्यटनस्थळ असल्याकारणाने या ठिकाणी हॉटेल्स व दुकाने यांचे प्रमाण जास्त आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असून, पर्यटकांनादेखील त्याचा सामना करावा लागत आहे. शहरांमध्ये वीजबिलाची वसुली ही 90 टक्क्यांपेक्षा अधिक असतानादेखील शहरामध्ये वारंवार वीज खंडित होण्याची समस्या का निर्माण होत आहे. मागील अनेक वर्षांपासून मागणी करूनदेखील शहरामध्ये सब स्टेशन उभारत येथील विजेची समस्या का सोडवली जात नाही?, असा सवाला नागिरक विचारत आहेत