

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाची कोणतीही करवाढ नसलेला 142 कोटी 83 लाख 10 हजार 952 रुपयांचे अंदाजपत्रक नुकतेच सर्वसाधारण सभेने मंजूर केले आहे. 20 लाख 952 रुपये शिल्लकीचे हे अंदाजपत्रक आहे.
लोणावळा नगर परिषदेचे अंदाजपत्रक सादरीकरण व मंजुरीसाठी 24 फेबुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. लोणावळा नगर परिषदेच्या नवीन सभागृहामध्ये 90 टक्क्यांहून अधिक सदस्य हे प्रथमच सभागृहाचे सदस्य असल्यामुळे हे अंदाजपत्रक प्रशासनाकडून सर्व सदस्यांना समजेल अशा पद्धतीने सादर करण्यात आले. तसेच त्यावरील सदस्यांच्या शंकांचे व समस्यांचेदेखील निराकरण करण्यात आल्याने दोन दिवस ही सभा सुरू होती. प्रशासनाकडून सादर करण्यात आलेले अंदाजपत्रक त्यावर सदस्यांची मते जाणून घेऊन सर्वानुमते साधक बाधक चर्चा करत हे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.
नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या सभेला उपनगराध्यक्ष देविदास कडू, मुख्याधिकारी अशोक साबळे, सभागृह नेते धनंजय काळोखे, विरोधी पक्षनेते उषा चौधरी यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सभापती सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व स्वीकृत सदस्य तसेच सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
2026 - 27 मध्ये होणाऱ्या अपेक्षित खर्चामध्ये सामान्य प्रशासन व वसुली खर्च ज्यामध्ये कायमसेवक वेतन चार कोटी वीस लाख रुपये, नगरपरिषद प्रशासकीय इमारत वीजबिल 40 लाख रुपये, सभासद अभ्यास दौऱ्यासाठी 10 लाख रुपये, सभा कामकाज रेकॉर्डिंग व सिस्टीम देखभाल दुरुस्तीसाठी 50 लाख रुपये, नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्यासाठी 20 लाख रुपये, नगर परिषद इमारतीमधील इतर दुरुस्त्यांसाठी वीस लाख रुपये, कंत्राटी पद्धतीने विविध विभागांसाठी अभियंता व कुशल मनुष्यबळ याकरिता 85 लाख रुपये अशा वेगवेगळ्या कामांसाठी मिळून 7 कोटी 71 लाख एक हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
स्टेशनरी कामांसाठी 66 लाख 60 हजार रुपये, वेगवेगळे परतावे, बोनस सानुग््राह अनुदान, प्रशासकीय खर्च, निवासभाडे, रजावेतन, निवृत्तीवेतन, वैद्यकीय प्रतिपूर्तता, फिरती साठीचा कर्मचाऱ्यांचा भत्ता, यासाठी बारा कोटी आठ लाख 26 हजार रुपये. अग्निशमन केंद्र देखभाल दुरुस्ती, पेट्रोल तसेच साधनसामग््राी खरेदी या सार्वजनिक सुरक्षिततेसाठी 22 लाख 50 हजार रुपये. सार्वजनिक दिवे देखभाल दुरुस्तीसाठी दोन कोटी 22 लाख रुपये. मोकाट व पिसाळलेली कुत्री पिंजरा व्यवस्था याकरिता सात लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा तसेच वेगवेगळ्या ठिकाणच्या पाण्याच्या टाक्यांची साफसफाई दुरुस्ती, शुद्धीकरण, पंपांचा वीजखर्च आदी कामांसाठी अकरा कोटी 36 लाख 91 हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर मलनिस्सारण अंतर्गत भुयारी गटार योजना देखभाल व दुरुस्तीसाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
लोणावळा शहरातील साफसफाई व स्वच्छता कामासाठी तसेच आरोग्य विभागातील वेगवेगळ्या बाबींवर होणारा खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, कंत्राटी पद्धतीने घरोघरचा कचरा गोळा करणे, वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी लाभार्थ्यास अनुदान, नगर परिषद हद्दीतील शौचालयांची नियमित साफसफाई, कंत्राटी पद्धतीने औषध फवारणी, गटारे व रस्ते कंत्राटी पद्धतीने साफ करणे, कचरा डेपोवर जेसीबी तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत जनजागृती आधी सर्व कामांवर मिळून 16 कोटी 61 लाख 75 हजार रुपये खर्च पुढील वर्षभरामध्ये अपेक्षित धरण्यात आला आहे.
लोणावळा नगर परिषदेने 2026 - 27 या वर्षासाठी 142 कोटी 83 लाख 10 हजार 952 रुपये जमेचा व 142 कोटी 83 लाख 10 हजार रुपये खर्च असलेला 20 लाख 952 रुपयांचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर व मंजूर केले. लोणावळा नगर परिषदेने जमा बाजूकडे नगर परिषदेला मिळणाऱ्या विविध कर व दरांच्या माध्यमातून 46 कोटी 22 लाख 80 हजार रुपये उत्पन्न पुढील वर्षभरामध्ये अपेक्षित धरले आहे. यामध्ये संकलित कर, जाहिरात कर, पाण्यावरील विशेष कर, विशेष शिक्षण कर, ड्रेनेज टॅक्स, अग्निशमन कर, घनकचरा व्यवस्थापन शुल्क, सांडपाणी व्यवस्थापन शुल्क, कचरा संकलन, उपयोगिता शुल्क या महत्त्वाच्या शुल्कांचा समावेश आहे.
तसेच नगर परिषदेच्या विविध मालमत्तांच्या भाड्यापोटी तसेच खंडाळा तलाव नौकाविहार आदींच्या माध्यमातून 28 लाख रुपये अपेक्षित उत्पन्न धरले आहे. नगरपालिका मार्केट फी, दैनंदिन बाजार फी, आठवडे बाजार फी व फेरीवाला धोरण अंमलबजावणी याच्या माध्यमातून 26 लाख 40 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. अतिक्रमण फी, खासगी इमारतीमध्ये भाजी विक्री, आर्किटेक्ट फी, हातगाडी फी, हॉटेल लायसन्स परवाना, मोबाईल टॉवर परवाना आदींच्या माध्यमातून 22 लाख 13 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. या व्यतिरिक्त कर थकबाकी व्याज, पाणी टँकर विक्री, फटाके स्टॉल लिलाव, जाहिरात फी, होर्डिंग व बॅनर, मालमत्ता हस्तांतरण शुल्क, पाणीपट्टी मुदतीत न भरल्यास थकबाकी रकमेवरील दंड अथवा शास्ती कर अशा वेगवेगळ्या प्रकारातून 8 कोटी 37 लाख 70 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘माजी वसुंधरा’ अभियानांतर्गत एक कोटी 50 लाख रुपये, मुद्रांक शुल्क अनुदानापोटी 9 कोटी रुपये, मौलाना आझाद अनुदान अंतर्गत 50 लाख रुपये, नगरपालिका सहाय्यक अनुदान अंतर्गत 27 कोटी रुपये असे मिळून 38 कोटी 10 लाख 50 हजार रुपये उत्पन्न अनुदान व अंशदानमधून अपेक्षित धरले आहे. नगरपरिषद वेगवेगळ्या कामांवर जो दंड आकारणी अथवा फी लावते त्याच्या अंतर्गत तब्बल 13 कोटी 50 लाख 50 हजार रुपये उत्पन्न 2026-27 या वर्षांमध्ये मिळेल, असे अपेक्षित धरण्यात आले आहे.