

लोणावळा: विज्ञानातील सर्वात जुन्या आणि अनुत्तरित रहस्यांपैकी एक असलेल्या “अवकाश मिती” या अत्यंत जटिल विषयावर लोणावळ्यातील अवघ्या 19 वर्षांच्या तरुण विद्यार्थ्याने प्रकाश टाकला आहे. येथील अन्वय प्रलोभ शेवलीकर या एयरोस्पेस इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने अवकाशाला तीनच मिती का? या विषयावर अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले असून, त्याच्या या थक्क करणाऱ्या कामगिरीची थेट “दूरदर्शन”ने ही दखल घेतली आहे. विशेष म्हणजे, अन्वयचे हे दुसरे पुस्तक आहे. यापूर्वी तो दहावीत असतानाच त्याने कॉस्मिक होरायझन या विषयावर पहिले पुस्तक लिहिले होते.
अवघ्या 19 व्या वर्षी इतक्या कठीण आणि रहस्यमय विषयावर लेखन करून जागतिक भौतिकीला भारतीय मुळांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अन्वयने केले आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल आणि लेखन कौशल्याबद्दल लोणावळ्यासह संपूर्ण जिल्ह्यातून व शैक्षणिक वर्तुळातून त्याचे कौतुक होत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
चांद्रयान ते होलोग््रााफिक सिद्धांत : एक रोमांचक प्रवास
अन्वयचे हे नवीन पुस्तक विज्ञानाच्या जगाला एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडते. भारताच्या “चांद्रयान-3” च्या ऐतिहासिक यशापासून सुरू होऊन महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईनचे स्पेसटाइम, स्टीफन हॉकिंगचे ब्लॅक होल, क्वांटम एन्टँगलमेंट आणि “होलोग््रााफिक सिद्धांत” पर्यंतचा एक अत्यंत रोमांचक प्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. पुस्तकात अन्वय एका जागी लिहितो की, अवकाश ही केवळ एक स्थिर पार्श्वभूमी नसून; त्याऐवजी, ते एक “कार्य” आहे, जे “क्वांटम एंटँगलमेंट”मधून निर्माण होते.
पाश्चात्य नव्हे, “भारतीय दृष्टिकोन” केंद्रस्थानी!
सहसा खगोलशास्त्र आणि भौतिकीवर पाश्चात्य लेखकांचा प्रभाव दिसून येतो. मात्र, अन्वयने या पुस्तकात पाश्चात्य दृष्टिकोनाऐवजी भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान आणि त्यांचे कार्य बह्मांड विज्ञानाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. भारताची वाढती अंतराळ शक्ती (उदा. इस्रो, गगनयान, नॅशनल क्वांटम मिशन) पाहता, हे पुस्तक तरुण वाचकांमध्ये वैज्ञानिक कुतूहल जागृत करण्याचे एक सशक्त माध्यम ठरणार आहे. प्रगत भौतिकी आणि भावी पिढीचे तरुण शास्त्रज्ञ यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून या पुस्तकाकडे पाहिले जात आहे.
संगीताचा वारसा, पण अन्वयने चोखाळली ‘वैज्ञानिक’वाट!
अन्वय शेवलीकर याला घरातून एक समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभला आहे. त्याचे आजोबा पंडित वसंत रामभाऊ शेवलीकर हे संगीत क्षेत्रातील अत्यंत नावाजलेले व्यक्तिमत्त्व असून, त्यांना संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठित “अमृत महोत्सव पुरस्कार” प्राप्त आहे. घरात संगीताचा असा मोठा वारसा असतानाही, अन्वयने विज्ञानाची एक वेगळी आणि आव्हानात्मक वाट चोखाळली. अन्वयचे वडील प्रलोभ शेवलीकर हे एक कुशल व्यावसायिक असून, आई स्वाती या उत्तम शिक्षिका आहेत. तसेच त्याचे आजोबा रामचंद्र बागदरे व आजी शैलजा बागदरे हे निवृत्त शिक्षक-शिक्षिका आहेत. या कौटुंबिक संस्कारांमुळेच अन्वय सध्या “क्वीन्स युनिव्हर्सटीि, बेलफास्ट” येथे एयरोस्पेस इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेत आहे.