

पिंपळे गुरव: पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वापरातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या राजमाता जिजाऊ उद्यानात तिकीट वाटपाचे काम अधिकृत कर्मचाऱ्यांऐवजी खासगी सुरक्षारक्षकांकडून होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सांगवी काटेपुरम सुदर्शननगर, कल्पतरू सोसायटी, भैरवनाथनगर व कवडेनगर तसेच आजूबाजूच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण व लहान मुले दररोज मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. उद्यान विभागात तिकीट काउंटरसाठी तीन कर्मचारी नेमलेले असतानाही, प्रत्यक्षात तिकीट वाटपाचे काम सुरक्षारक्षकांकडून केले जात असल्याचा प्रकार नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरला आहे. आर्थिक व्यवहाराची संवेदनशील जबाबदारी खासगी सुरक्षारक्षकांकडे देणे चुकीचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू असूनही प्रशासनाला त्याची कल्पनाच नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
उद्यानाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
तिकीट खिडकीवर उद्यान विभागाचे तीन कर्मचारी उपलब्ध असताना खासगी सुरक्षारक्षकांची गरज काय?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तिकीट वाटपाच्या कामात गुंतल्यामुळे सुरक्षारक्षक नागरिकांची सुरक्षितता, स्वच्छता, शिस्त, सार्वजनिक मालमत्तेची देखभाल आणि गर्दी नियंत्रण या मूलभूत जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे उद्यानाच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
तिकीट काउंटरवर सुरक्षारक्षक बसल्याची बाब आमच्या निदर्शनास आली आहे. सुरक्षारक्षकांना त्यांच्या नेमून दिलेल्या कामावरच लक्ष देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यापुढे कोणताही सुरक्षारक्षक तिकीट खिडकीवर बसणार नाही. असा प्रकार पुन्हा आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
प्रमोद निकम, सहायक सुरक्षा अधिकारी, महापालिका
प्रशासनाचे दुर्लक्ष उघड
मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनाही या प्रकाराची कल्पना नसल्याचे समोर आले आहे. इतक्या महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमिततेकडे उद्यान विभाग आणि सुरक्षा विभाग सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने तिकीट व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खासगी सुरक्षारक्षकांना तिकीट काउंटरवर बसविण्यास मनाई आहे. याबाबत सुपरवायझरशी चर्चा करून कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. पुढे कोणताही सुरक्षारक्षक तिकीट काउंटरवर आढळल्यास तात्काळ आवश्यक कारवाई केली जाईल.
महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक महापालिका
उद्यानातील गर्दी आणि महसूल
उद्यानात दररोज 500 ते 1000 नागरिकांची, तर शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशी 2000 पेक्षा जास्त नागरिकांची गर्दी होत असते. उद्यानातून दरवर्षी तब्बल 70 ते 80 लाखांचे उत्पन्न मिळते. असे असतानाही तिकीट खिडकीवर खासगी सुरक्षा रक्षकांकडून तिकीट वाटप करवून घेणे अत्यंत गंभीर व संशयास्पद आहे, असे नागरिकांचे मत आहे.
सहा महिने खासगी सुरक्षारक्षक तिकीट काउंटरवर बसत आहेत आणि प्रशासनाला माहितीच नाही हीच सर्वांत लाजिरवाणी गोष्ट आहे. कागदावर कर्मचारी दाखवायचे आणि प्रत्यक्षात सुरक्षारक्षकांकडून तिकीट वाटप करवून घ्यायचे, हा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे.
स्थानिक नागरिक