

पिंपरी: गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट झाल्याने शहर परिसरातील वातावणात गारठा जाणवत आहे. वाढत्या थंडीमुळे ताप, सर्दी, खोकल्यासह अन्य साथीच्या आजाराने रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसांमध्ये 8,756 तापाचे रुग्ण आढळले आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किमान तापमान 15. 1 अंश होते. तापमानात मोठी घट झाली होती. त्यांनतर किमान तापमान 17 अंशापर्यंत होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमान 18 अंशापर्यंत होते. आता पुन्हा किमान तापमानात घट झाली असून किमान तापमान 14.2 पर्यंत खाली घसरले आहे.
त्यामुळे मध्येच काही दिवस थंडी तर काही दिवस दमटपणा या पर्यावरणातील या बदलामुळे प्रकृतीत असंतुलन निर्माण होऊन काही नागरिक ताप, डोके दुखी, अंग दुखणे, सर्दी, खोकला, वात विकार, हाडे दुखणे आदी आजारांना वाढले आहेत.
हवेच्या माध्यमातून होणाऱ्या संसर्गाने ताप येण्याचे प्रमाण वाढले असून अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे अशा तक्रारींतही वाढ झाली आहे.
पहाटे आणि रात्री उशिरा घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीमुळे गरम पेयांचा आधार घेतला जात आहे. शहरातील रस्त्यांवर देखील ऊबदार कपडे विकणारे पहायला मिळत आहेत. स्कार्फ, कानटोपी, स्वेटर, जॅकेटची नागरिकांकडून खरेदी केली जात आहे.