

चऱ्होली : महाराष्ट्रातील पवित्र इंद्रायणी नदी सध्या गटार गंगा बनली आहे. ही नदी ग््राामीण आणि शहरी भागातून वाहते. बहुतांश ठिकाणी एसटीपी प्लांट नसल्याने मैलामिश्रित दूषित पाणी थेट इंद्रायणी नदीत मिसळत असल्याने नदीचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
देहू फाटा मोशी रस्त्यावर ज्या ठिकाणी डुडुळगावचा मुख्य चौक आहे त्या चौकातून खाली डुडुळगावकडे जाणाऱ्या रस्त्याने जाताना मारुती मंदिराच्या अलीकडून वाहणाऱ्या ओढ्यातून मोठ्या प्रमाणावर ड्रेनेजचे पाणी इंद्रायणी नदीत मिसळत आहे. येथे कित्येक ठिकाणी ड्रेनेजचे चेंबर फुटलेले असून, त्यातून वाहणारे मैलामिश्रित पाणी सरळ इंद्रायणीत सोडून देण्यात आले आहे. आजूबाजूला शेती आणि दाट झाडी असल्यामुळे काही ठिकाणी खोलवर भाग आहे, तर काही ठिकाणी अत्यंत उथळ परिसर आहे. वर्षानुवर्ष अत्यंत रापलेल्या स्थितीतला भाग असल्यामुळे या ठिकाणी इतकी प्रचंड दुर्गंधी आहे की, थोडा वेळ थांबणेदेखील अत्यंत अवघड आहे.
तळेकर चौकातून नदीकडे जाताना अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी दूषित प्रवाह थेट नदीत सोडला आहे. या ठिकाणी ड्रेनेजचे चेंबर फोडण्यात आले आहेत आणि मोठे पाईप बसवून त्या माध्यमातून पाणी थेट नदीपात्रात सोडले आहे. या ठिकाणाच्या पलीकडील बाजूला आळंदीतील सिद्धबेटाचा परिसर आहे. ज्या ठिकाणी वारकरी आणि सिद्ध पुरुष तपश्चर्या करतात अशा परिसराच्या नजीकच दूषित पाणी सोडले आहे. यामुळे इंद्रायणी नदीबरोबरच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
देहू फाटा ते मोशी रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणावर डोंगर आहेत. या डोंगरामधून उगम पावणारे ओढे नैसर्गिकरित्या इंद्रायणी नदीला येऊन मिळतात. डुडुळगावचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती निर्माण झाल्या. लोकसंख्या वाढू लागली. डोंगराच्या परिसरातच बहुमजली इमारती झाल्या आणि या इमारतींमधून राहायला आलेल्या मोठ्या प्रमाणातील निवासी लोकसंख्येमुळे सांडपाणी आणि ड्रेनेजचे मैलायुक्त पाणी सर्रासपणे ओढ्यात सोडून देण्यात आले आहे. आणि या पाण्यामुळेच इंद्रायणी प्रदूषित होत आहे.
या ठिकाणी जे दूषित पाणी नदीमध्ये मिसळते तेच पाणी पुढे आळंदीला जाते. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या ठिकाणी दर्शनासाठी येतात. इंद्रायणी नदीच्या पाण्याने स्नान करतात. इंद्रायणीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या इंद्रायणी नदीच्या पाण्याला सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून संरक्षण देणे व हे पाणी शुद्ध स्वरूपात पवित्र ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी नाही का?शोएब शेख, उपअभियंता, ड्रेनेज विभाग, महापालिका.
वहिले चौकातून डुडुळगावकडे जाताना मारुती मंदिराच्या अलीकडील बाजूला ड्रेनेजच्या पाण्याचा दुर्गंधीयुक्त दर्प येतो. याच रस्त्याने पुढे स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी व दशक्रियेसाठी जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे नागरिकांना व पाहुणे मंडळींना मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागते.
सुनील वहिले, नागरिक, डुडुळगाव.
तळेकर चौकातून नदीमार्गाने गेले असता मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी सरळ नदीपात्रात सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने दक्षता घ्यावी.
योगेश तळेकर, सामाजिक कार्यकर्ते डुडुळगाव.
सदर ठिकाणची पाहणी केली आहे. त्याप्रमाणे संबंधितांना नोटीस बजावण्यात येईल. ज्या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात मिसळत आहे ते पाणी नदीपात्रात मिसळणार नाही याची गांभीर्याने काळजी घेण्यात येईल.
शोएब शेख, उपअभियंता, ड्रेनेज विभाग, महापालिका.