

रावेत, किवळे, मामुर्डी प्रभाग 16 ब या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार जयश्री मोरेश्वर भोंडवे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला होता. त्यावरून त्यांना अपक्षाचे चिन्ह देण्यात आले होते. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे एबी फॉर्म जोडला होता. त्याबाबत प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह देण्यात यावे, असा निर्णय देण्यात आला. त्यानुसार, जयश्री भोंडवे यांनी घड्याळ चिन्ह देण्यात आले आहे. ती प्रक्रिया सायंकाळी उशिरा पूर्ण झाली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांनी सांगितले.
भाजपा उमेदवारांना कपाट, एअर कंडिशनर, कपबशी चिन्ह
एबी फॉर्म वेळेत सादर न केल्याने थेरगाव, गुजरनगर प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपाच्या तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यांनी अपक्ष सादर केलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे त्यांना अपक्षासाठी असलेले चिन्ह मिळाले आहे. भाजपाच्या उमेदवार शालिनी गुजर यांना कपाट चिन्ह मिळाले आहे. करिश्मा बारणे यांना एअर कंडिशनर तर, गणेश गुजर यांचे कपबशी हे चिन्ह आहे. या तीन उमेदवारांना भाजपाने पुरस्कृत केले आहे. निवडणुकीतील तांत्रिक कारणांचा फटका बसल्याने भाजपाच्या या तीन उमेदवारांना अपक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यासाठी नव्याने पत्रक, झेंडे व इतर साहित्य छापण्याची वेळ आली आहे. शिवसेनेच्या रुपाली गुजर यांना ऑटो रिक्शा हे चिन्ह मिळाले आहे. या उमेदवाराला शिवसेनेने पुरस्कृत केले आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांना कपबशी, पुस्तक, नारळ, अंगठी यासह अनेक मुक्त निवडणूक चिन्ह देण्यात आहे. तर, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना निश्चित असलेले पक्ष चिन्ह देण्यात आले आहे. चिन्ह मिळाल्याने अपक्षांनी प्रचारात उडी घेतली आहे. त्यामुळे सर्वच प्रभागात उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या प्रचार रॅलीने वातावरण ढवळून निघत आहे.
महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांसह राज्य व स्थानिक आघाडीचे उमेदवार आहेत. तसेच, शेकडो अपक्ष उमेदवार आहेत. एकूण 126 जागांसाठी तब्बल 692 उमेदवार रिंगणात आहेत. अधिकृत पक्षाचे तसेच, अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप निवडणूक आयोगाच्या नियमानुसार करण्यात येते. सर्व आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात शनिवार (दि. 3) उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. प्रथम राष्ट्रीय मान्यता असलेल्या पक्षाच्या उमेदवारांना चिन्ह त्यानंतर, राज्यस्तरीय पक्षाचे चिन्ह, त्यानंतर इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्ष आणि सर्वात शेवटी स्वतंत्रपणे लढणारे व अपक्षांचे चिन्ह असे वाटप करण्यात आले. अपक्ष व स्वतंत्रपणे लढणाऱ्या उमेदवारांना मुक्त चिन्हातून एक चिन्ह निवडावे लागते. निवडणूक आयोगाच्या ठरवून दिलेल्या क्रमाने उमेदवारांची नावे व चिन्ह येतात. त्यानुसारच उमेदवारांची नावे बॅलेट पेपरवर (मतपत्रिका) येतात.
राष्ट्रीय मान्यता प्राप्त पक्ष असलेल्या भाजपाला कमळ, काँग्रेसला हात, आम आदमी पक्षाला झाडू, बहुजन समाज पार्टीला हत्ती तसेच, शिवसेनेला (एकनाथ शिंदे) धनुष्यबाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल, राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस, मनसेला रेल्वे इंजिन असे चिन्ह आहे. त्या पक्षानंतर अपक्षांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे.
अपक्षांनी कपबशी, पुस्तक, नारळ, अंगठी, सफरचंद या चिन्हास सर्वांधिक पसंती दिली आहे. तसेच, काही अपक्ष तसेच, बंडखोर उमेदवारांना सूर्यफूल, बस, कपाट, बॅट, शिवण यंत्र, पुस्तक, बुद्धीबळ, शिटी, लॅपटॉप, गॅस सिलिंडर, कोट, एअर कंडिशनर, फलंदाज, ऑटो रिक्शा, पांगुळगाडा, फुगा, हेलिकॉप्टर, स्टम्प, पेनाची नीब, फुगा, टोपली, हिरा, छत्री, विजेरी (टॉर्च), फुटबॉल, किटली, शिट्टी, नारळाची बाग असे चिन्ह मिळाले आहे. चिन्ह मिळाल्याने अपक्षांनी आजपासून जोरदार प्रचार सुरू केला आहे. चिन्हासह माहितीपत्रके, झेंडे छापून घेऊन प्रचार केला जात आहे. तसेच, सोशल मीडियावर मिळालेले चिन्ह मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहे. काही उमेदवारांनी चिन्हाला समर्पक असे आकर्षक वाक्य व गाणेही तयार केली आहेत. ती गाणे संपर्क कार्यालयाबाहेर, रॅलीत तसेच, रिक्षातून वाजवले जात आहेत.