

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक मैदानात भाजपा, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना (एकनाथ शिंदे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि आम आदमी पार्टी असे सात पक्षांचे शहराध्यक्ष उतरले आहेत. त्या सात शहराध्यक्षांना नगरसेवकपदाचे वेध लागले आहेत. त्यातील कोणता शहराध्यक्ष यशस्वी कर्णधार म्हणून महापालिका सभागृहात जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महापालिकेच्या निवडणूक रिंगणात स्थानिक पातळीवरील नेते उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत विविध सात राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष स्वत: उमेदवार आहेत. पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये भाजपाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे हे उमेदवार आहेत. ते तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. वल्लभनगर, कासारवाडी, पिंपरी प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल पुन्हा निवडणूक आखाड्यात आहेत. ते माजी महापौर आहेत. तसेच, त्यांनी सत्तारूढ पक्षनेते व माजी विरोधी पक्षनेतेपदही भूषवले आहे. ते सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे पिंपळे निलख, कस्पटेवस्ती, वाकड प्रभाग क्रमांक 26 मधून लढत आहेत. तेही माजी नगरसेवक आहेत. ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. निगडी, यमुनानगर प्रभाग क्रमांक 13 मधून मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले तिसऱ्यांदा लढत आहेत.
शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) शहरप्रमुख नीलेश तरस हे रावेत, किवळे, मामुर्डी प्रभाग क्रमांक 16 येथून पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले आहेत. वाकड, ताथवडे, पुनावळे प्रभाग क्रमांक 25 मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर हेदेखील पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. पिंपळे निलख, कस्पटेवस्ती, वाकड प्रभाग क्रमांक 26 मधून आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे हे पहिल्यांदा निवडणूक रणसंग्रामात उतरले आहेत.
या शहराध्यक्षांना पक्षांच्या सर्व उमेदवारांसह आपल्या प्रभागात प्रचार यंत्रणा सांभाळावी लागणार आहे. त्यामुळे त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. कोणता शहराध्यक्ष विजयी होऊन महापालिका सभागृहात कॅप्टन म्हणून प्रवेश करतो, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.