

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचाही महापौर होऊ शकत नाही, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. शनिवार (दि. 3) सामंत हे वाकड येथे बोलत होते.
निवडणूक निमित्ताने सामंत हे पिंपरी दौऱ्यावर आले हेोते, यावेळी ते बोलत होते.
या वेळी सामंत म्हणाले की, केंद्र व राज्यात सत्तेत एकत्र असल्याने भाजपासोबत युतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र, युती होऊ शकली नाही. तरीही शिवसेनेला ताकदीचे उमेदवार मिळाले असून, त्यामुळे आगामी सत्ताकारणात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
प्रचारादरम्यान टीका-टिप्पणी टाळून आपण मतदारांसमोर कोणती कामे करणार आहोत, यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी उमेदवारांना केले. अनेक उमेदवार नवीन असून त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी नमतेने जनतेशी संवाद साधावा. टीका-टिप्पणी करून मते वाढत नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महापालिका निवडणूक ही संघर्षाची असल्याचे सांगत, उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करावा, तसेच शेवटच्या टप्प्यातील दबाव किंवा दादागिरीच्या राजकारणाला ठामपणे सामोरे जावे, असे आवाहन सामंत यांनी केले.