

पिंपरी: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस.टी. ने प्रवासादरम्यान चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत होती. गर्दीच्या वेळी आणि बसस्थानकांवर चोरट्यांकडून महिलांच्या मौल्यवान वस्तूवर डल्ला मारला जात होता. त्यामुळे एसटी प्रशासनाने महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन, अकरा सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. स्वारगेट, वाकडेवाडी आणि पिंपरी-चिंचवड या आगारात प्रत्येकी तीन महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना आता सुरक्षितरित्या प्रवास करता येणार आहे.
पुण्यातून स्वारगेट, वाकडेवाडी आणि वल्लभनगर आगार येथून राज्याच्या विविध भागात दीड हजारापेक्षा आधिक गाड्यांची ये-जा असते. त्यामुळे या स्थानकात प्रवाशांची कायम गर्दी असते. या गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे महिलांचे दागिने पर्सवर डल्ला मारतात. त्यामुळे महिलांना प्रवासास निघण्यापूर्वीच आर्थिक फटका बसतो.
महिला सन्मान योजनेत तिकिटात महिलांना 50 टक्के सवलत मिळत असल्यामुळे महिलांची एस.टी.ला मोठी पसंती आहे. पण एकीकडे निम्म्या तिकिटात प्रवास करण्यासाठी गर्दी करणाऱ्या महिलांच्या दागिन्यांची शिवाजीनगर, स्वारगेट आगारांतून चोरी होत आहे. त्यामुळे महिलांना प्रवासात आर्थिक फटका बसत आहे. तसेच आगार परिसरात विद्यार्थिनींशी गैरवर्तन, प्रवाशांना मारहाण, असे प्रकार घडत आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वारगेट, वाकडेवाडी आणि पिंपरी- चिंचवड आगारात सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक नेमले आहे.
आगार परिसरात महिला सुरक्षा रक्षकांकडून सतत गस्त आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. महिलांची छेडछाडप्रकरणी हस्तक्षेप करणे, तसेच गरजू महिलांची मदत करणे इत्यादी कामे महिला सुरक्षारक्षक करणार आहेत.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. महिला सुरक्षारक्षक महिलांच्या समस्या जाणून तातडीने त्यांना मदत करू शकतात. तसेच कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी या सुरक्षारक्षक सदैव सतर्क असतील.
संजय वाळवे, आगारप्रमुख वाकडेवाडी
महिला सुरक्षारक्षक या सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत आगार परिसरात कार्यरत असतील. चोरीच्या घटना, तसेच कोणताही चुकीचा प्रकार घडू नये, यासाठी महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रमोद धायतोंडे, आगार प्रमुख