

नवी सांगवी: सांगवी, कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील प्रमुख चौकांमध्ये अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे परिसराचे दिवसेंदिवस विद्रुपीकरण होत आहे. बांबू व लोखंडी सांगाड्यांच्या आधाराने लावले जाणारे हे मोठ्या आकाराचे फ्लेक्स जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पादचारी व वाहनचालकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला असून, अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी येथील परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
दत्त जयंती उत्सव विविध सण, नेत्यांचे वाढदिवस, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, उद्घाटन समारंभ यासाठी मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावले जात आहेत. त्यामुळे परिसराचे दिवसेंदिवस विद्रूपीकरण होत चालले आहे. नवी सांगवी येथील फेमस चौक, क्रांती चौक, कृष्णा चौक, साई चौक, जुनी सांगवी येथील शितोळे चौक, ममतानगर, बँक ऑफ महाराष्ट्र चौक, दापोडी येथील रेल्वे फाटक, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, फुगेवाडी येथील शिवाजी चौक, कासारवाडी येथील गेटा खालील परिसर आदी भागांत अनधिकृपणे फ्लेक्स लावण्यात येत असल्याने परिसराचे विद्रुपीकरण होत आहे.
अनधिकृत फ्लेक्समुळे परिसरातील विविध चौकांचे विद्रुपीकरण होत चालले आहे. यामुळे अपघात घडून येत आहेत. अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.
सुमित भोसले, आंतरराष्ट्रीय मल्ल
सांगवी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी येथील परिसरात महापालिकेने विविध मार्गदर्शक फलक लावले आहेत. सांगवीत कृष्णा चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविले आहेत. काही भागात दिशादर्शक फलक आणि वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या खांबालाही फ्लेक्स लावण्यात येत असल्याने विद्रुपीकरणात अधिकच भर पडली आहे.
फ्लेक्स काढण्याची कारवाई नियमित करण्यात येत आहे. यापुढे देखील क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या परिसरात अनधिकृतपणे लावलेले फ्लेक्स काढण्यात येतील.
कालिदास शेळके, मुख्य बीट निरीक्षक, अतिक्रमण विभाग
अपघाताचा धोका
नवी सांगवी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी येथील गेटा खालील भाग आदी परिसरात प्रमाणापेक्षा अधिक लांबी रुंदीचे अनधिकृत फ्लेक्स बांबूच्या साहाय्याने लावले जातात. या फ्लेक्सला लोखंडी सांगाडाही असतो. जोराच्या वाऱ्यामुळे हे फ्लेक्स पडून नागरिकांचा अपघातही होऊ शकतो. जोराच्या वाऱ्यामुळे देखील फ्लेक्स पडून अघटित घटना घडू शकते. लाखो रुपये खर्च करून दुकानासमोरील रस्त्यावर मोठ मोठे अनधिकृत फ्लेक्स लावण्यात येत असल्याने दुकान झाकून जाते. याचा व्यवसायावरही परिणाम होत असल्याची तक्रार आदी परिसरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.
प्रभाग क्षेत्रात येणाऱ्या परिसरातील अनधिकृत फ्लेक्स काढण्याची कारवाई नियमित करण्यात येते. परिसरात अनधिकृत फ्लेक्स लावले जाऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल.
पूजा दुधनाळे, महफ क्षेत्रीय अधिकारी
निवडणुकीमुळे फ्लेक्सबाजी वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. आपला चेहरा नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी इच्छुक उमेदवाराद्वारे इतर जाहिरातीच्या माध्यमांसह अनधिकृत फ्लेक्सचाही आधार घेतला जात आहे. त्यामुळे येथील परिसरातील मुख्य चौकांत येत्या काही दिवसांत फ्लेक्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु महापालिकेचा अतिक्रमण विभाग याकडे डोळेझाक करताना दिसून येत आहे.
सध्या मतदार याद्या दुरुस्ती आणि निवडणुकीच्या कामात कर्मचारी व्यस्त झाल्याने गेल्या सात-आठ दिवसांपासून शहर परिसरातील अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्जवरील कारवाई थंडावली आहे. मात्र, पुन्हा महापालिकेतील क्षेत्रीय कार्यालयांच्या सहकार्याने अनधिकृत फ्लेक्स विरोधात पुन्हा कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे.
राजेश आगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह परवाना विभाग