

नवलाख उंबरे: रब्बी हंगामाच्या उत्तरार्धात दाखल झालेल्या फेबुवारी महिन्यात जिल्ह्यातील शेतशिवारात गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा या प्रमुख पिकांची वाढ जोमात सुरू आहे. हिवाळ्याच्या सौम्य वातावरणाचा फायदा या पिकांना मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या बहुतांश ठिकाणी ही पिके दाणे भरण्याच्या व शेंगा लागण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहेत.
यंदा डिसेंबर व जानेवारी महिन्यात पडलेली थंडी आणि त्यानंतर आलेले कोरडे, स्वच्छ हवामान गहू पिकासाठी पोषक ठरले. वेळेवर पाणी व खत व्यवस्थापन केलेल्या शेतांमध्ये गव्हाची वाढ समाधानकारक दिसून येत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही आठवडे वातावरण स्थिर राहिल्यास गव्हाचे उत्पादन सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे बाजरी पीकही अनेक भागात चांगल्या स्थितीत आहे. कमी पाण्यावर तग धरणारे हे पीक सध्या कणसात दाणे भरण्याच्या टप्प्यात असून, चाऱ्यासाठीही त्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे बाजरी शेतकऱ्यांना अन्नधान्याबरोबरच पशुखाद्याचाही फायदा मिळत आहे. हरभरा पीक सध्या फुलोरा व शेंगा येण्याच्या अवस्थेत आहे. एकूणच फेबुवारी महिन्यात गहू, बाजरी व हरभरा या पिकांची स्थिती समाधानकारक असून, पुढील काळात हवामान अनुकूल राहिल्यास शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे.
काही भागांत पीक चांगले भरत असल्याचे चित्र दिसत असले तरी कीटकांचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. योग्य वेळी फवारणी केल्यास नुकसान टाळता येईल.
मारुती साळे, कृषी अधिकारी, मावळ तालुका
यंदा पीक खूपच चांगले आले आहे. थंडीमुळे वाढ व्यवस्थित झाली. आता फक्त बाजारभाव चांगला मिळाला तर मेहनतीचे चीज होईल.
नाना ढोरे, शेतकरी, इंदोरी.
पिकांनी यंदा साथ दिली आहे. पाणी कमी असूनही पीक तग धरून आहे. मात्र, अवकाळी पावसाची भीती कायम आहे.
एकनाथ शेटे, शेतकरी, नवलाख