

खराळवाडी: चिंचवड पोस्ट मुख्य कार्यालयात मागील पंधरा दिवसांपासून आधार दुरुस्तीचे केंद्र बंद आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे पोस्ट कार्यालयात आवश्यक यंत्रणा, संगणक, इंटरनेट सुविधा असूनही केवळ चिंचवड पोस्ट कार्यालयाच्या मनमानी पद्धतीने ही सेवा बंद करण्यात आलेली आहे.
आधार कार्ड हे आजच्या घडीला सरकारी योजना, बँक खाते, शिधापत्रिका, शिष्यवृत्ती, पेंशन, लाडकी बहीण योजना, गॅस सबसिडी, मतदान यादी दुरुस्ती यांसारख्या अनेक कामांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. मात्र, नागरिकांना आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख दुरुस्ती किंवा मोबाईल नंबर लिंकिंगसाठी नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.
खासगी आधार केंद्रांवर जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीदेखील नागरिकांकडून होत आहेत. सरकारी कार्यालयात मोफत किंवा नाममात्र शुल्कात मिळणारी सेवा बंद असल्याने सामान्य नागरिकांवर आर्थिक तान वाढत आहे. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील हजारो नागरिक दररोज विविध कामांसाठी पोस्ट कार्यालयात येतात. पोस्ट कार्यालय हे नागरिकांचे महत्वाचे केंद्र मानले जाते. अशा ठिकाणी आधारसारखी मूलभूत सेवा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे केंद्र बंद
चिंचवड ईस्ट हेड ऑफिसचे उद्घाटन 17 जानेवारी रोजी झाले. तेव्हापासून हे आधार कार्ड सेवा केंद्र स्टाफची जुळवाजुळव करताना दिसत आहे. तरी अजून पुरेसा कर्मचारी स्टाफ उपलब्ध नसल्याने हे आधार केंद्र बंद आहे. शाळेतील मुलांना आधार कार्ड दुरुस्तीसाठी ती मशिन पिंपरी चिंचवड शहरातील विविध शाळेत मागणीनुसार जाते; परंतु डाक कार्यालय बंद असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा केली जात आहे.
हेड ऑफिस झाल्याने सध्या सेटअपचे काम सुरू आहे. त्यासाठी आधार अद्यावत करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून ठेवली आहे. तरी लवकरच त्यासाठी कर्मचारी मिळाले की चार पाच दिवसांत आधार दुरुस्तीचे काम सुरू होईल.
नितीन बने, जनसंपर्क अधिकारी, पोस्ट कार्यालय, चिंचवड
हे केंद्र बंद असल्याने नागरिकांना आधार दुरुस्तीसाठी बँक, आधार सेवा केंद्र, महापालिका, तहसील कार्यालय इत्यादी ठिकाणी फिरावे लागते.तरी चिंचवड येथील ईस्ट पोस्ट कार्यालयात ही सुविधा लवकर सुरू करण्यात यावी.
विजय साळवी, नागरिक