Dehu Road Eco Friendly Ganesh Idols: देहूरोडमध्ये ‘लाल मातीचा बाप्पा’! पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना भक्तांची पसंती

सहा इंचांपासून सहा फुटांपर्यंतच्या मूर्ती उपलब्ध; नैसर्गिक रंगांचा वापर, विसर्जनानंतर मातीचा खत म्हणून उपयोग
Eco Friendly Ganesh Idols
Eco Friendly Ganesh IdolsPudhari
Published on
Updated on

देहूगाव: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने देहूगाव व देहू रोड परिसरातील गणेशमूर्ती कलाकारांच्या कार्यशाळांमध्ये लगबग वाढली आहे. विविध आकार, आकर्षक रचना आणि वेगवेगळ्या उंचीच्या गणेशमूर्ती साकारण्याचे काम कलाकारांनी पूर्ण केले असून, सध्या बाजारात मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत.

Eco Friendly Ganesh Idols
Wadgaon Maval Sports Complex: वडगाव मावळच्या क्रीडासंकुलासाठी पोटोबा देवस्थानची जागा द्या; राजकारण न करण्याचे आवाहन

गणेशमूर्तींना आकर्षक रंगसंगती देण्याबरोबरच डोळे, मुकुट, दागिने, वस्त्रालंकार आणि इतर बारकावे पूर्ण करण्यासाठी कलाकार दिवसरात्र मेहनत घेत आहेत. बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवून त्याला मोहक आणि प्रसन्न रूप देण्याचे काम सध्या सुरू आहे. देहूगाव व देहूरोड परिसरातील मूर्तिकारांनी यंदा भक्तांच्या आवडीनुसार पारंपरिक तसेच विविध संकल्पनांवर आधारित गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. छोट्या घरगुती मूर्तींपासून मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींपर्यंत विविध आकारांच्या मूर्ती कार्यशाळांमध्ये पाहायला मिळत आहेत.

Eco Friendly Ganesh Idols
Pimpri Chinchwad Dhol Tasha: गणेशोत्सवाची चाहूल; पिंपरी-चिंचवडमध्ये ढोल-ताशांच्या मागणीला जोर

गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतशी मूर्तींच्या मागणीमध्येही वाढ होत असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बाप्पाच्या आगमनाची चाहूल देहूगाव-देहू रोड परिसरात स्पष्टपणे जाणवू लागली आहे. कलाकारांच्या हातातून साकारलेला बाप्पा आता भक्तांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Eco Friendly Ganesh Idols
Pimpri Chinchwad Chain Snatching: पिंपरी-चिंचवडमध्ये १५ चेनचोरींचा पर्दाफाश; ४०० ते ५०० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी मुंबईपर्यंत ट्रेस

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना भक्तांची पसंती

यंदाच्या गणेशोत्सवात मात्र पारंपरिक मूर्तींसोबतच पर्यावरणपूरक लालमातीच्या गणेशमूर्तींना भक्तांकडून विशेष पसंती मिळत आहे. चेन्नई आणि तेलंगणातून आणलेल्या खास लालमातीसोबत मावळच्या भूमितील पवित्र माती आणि विविध नैसर्गिक घटकांचा वापर करून आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत. पर्यावरणपूरकतेसोबतच धार्मिक आणि नैसर्गिक घटकांचा सुंदर संगम या मूर्तींमध्ये पाहायला मिळत आहे. या गणेशमूर्तींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये गोमूत्र तसेच ११ पवित्र पत्री आणि विविध नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात येत आहे. मूर्तींना रंग देताना रासायनिक रंगांना पूर्णपणे फाटा देण्यात आला असून, हळद, कुंकू, अष्टगंध आणि अबीर यांसारख्या नैसर्गिक रंगांचा वापर केला जात असल्याचे कलाकार मनोहर चक्रवर्ती यांनी सांगितले.

Eco Friendly Ganesh Idols
Chakan MIDC Fire: चाकण एमआयडीसीत कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

विसर्जनानंतर मातीचा खत म्हणून उपयोग

लाल मातीपासून तयार केलेल्या या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात सहज विरघळतात. त्यातून उरलेली माती झाडांसाठी खत म्हणून वापरता येत असल्याने ‘बाप्पाची भक्ती आणि पर्यावरणाची राखण’ असा दुहेरी संदेश या मूर्ती देत आहेत. दरम्यान, पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जनामुळे निर्माण होणारे पर्यावरणीय प्रश्न आजही गंभीर आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात सहज विरघळत नसल्याने त्याचे अवशेष विहिरी, तलाव तसेच पवना आणि इंद्रायणी नदीसारख्या जलस्रोतांमध्ये दीर्घकाळ राहतात. त्यात वापरलेल्या रासायनिक रंगांमुळे जलप्रदूषणाचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्वीकारणे ही केवळ बदलती परंपरा नसून, निसर्गाप्रती असलेली जबाबदारीही आहे, असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.

सहा इंचांपासून सहा फुटांपर्यंतची मूर्ती

विशेष म्हणजे, सहा इंचांपासून तब्बल सहा फूट उंचीपर्यंतच्या लालमातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. घरच्या घरी विसर्जन करता यावे, यासाठी त्याची सुविधाही देण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात देहूरोड परिसरात ‘लाल मातीचा बाप्पा’ भक्तांच्या घरोघरी विराजमान होण्याची शक्यता असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागर देहूरोडमधून होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news