

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात वारंवार घडणाऱ्या चेनचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने सराईत चेनचोरांचा माग काढत महत्त्वाची कारवाई केली आहे. निगडीतील एका चेनचोरीच्या गुन्ह्याच्या तपासात आरोपींच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील सुमारे ४०० ते ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी मुंबईपर्यंत माग काढला. या तपासातून पिंपरी-चिंचवडमधील १३ आणि पुणे शहरातील दोन अशा एकूण १५ चेनचोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली. आरोपींकडून ३५ लाख ३३ हजार रुपये किमतीचे २७ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
फिदा हुसैन मानुअली इराणी (३३, रा. महात्मा गांधी वसाहत, इराणीवस्ती, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) आणि मुकेश अरुण नेटके (३८, रा. गल्ली क्रमांक २, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरातील चेनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या पथकाने चेनचोरीच्या घटनांचा समांतर तपास सुरू केला.
निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका चेनचोरीच्या तपासात घटनास्थळापासून आरोपी पळून गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजच्या आधारे फिदा इराणी आणि आदित्य मनलोर यांची ओळख पटली. त्यानंतर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ५ सप्टेंबर रोजी फिदा इराणी याला देहूरोड परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्यासोबत मुकेश नेटके यालाही पोलिसांनी अटक केली.
फिदा इराणीच्या चौकशीत त्याने आदित्य मनलोर आणि कासीम जाफर हुसेन यांच्यासोबत तसेच काही गुन्हे एकट्याने केल्याचे निष्पन्न झाले. एमआयडीसी भोसरी, तळेगाव दाभाडे, देहूरोड, निगडी, रावेत, हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १३ चेनचोरींसह पुणे शहरातील दोन गुन्ह्यांची उकल या तपासातून झाली आहे.
मकोकासह पाच गुन्ह्यांत होता फरार
फिदा इराणी हा पाच गुन्ह्यांत पोलिसांना पाहिजे होता. रावेत पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी खुनाचा प्रयत्न आणि चेनचोरीसारखे दहा गंभीर गुन्हे नोंद आहेत. मुकेश नेटके याच्याविरोधात अमली पदार्थ बाळगल्याचा एक गुन्हा नोंद आहे. आदित्य मनलोर हा सध्या रावेत पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे.
आणखी दोन सराईत ताब्यात
चेनचोरी आणि बतावणीच्या प्रत्येकी पाच गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या तालीब बाबा इराणी (२१) आणि अली अब्बास शौकत इराणी (२८, दोघे रा. इराणी वस्ती, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) यांनाही ८ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्यांना पुणे ग्रामीणच्या यवत पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यंदा ३२ चेनचोरींची उकल
या कारवाईसह मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने २०२६ मध्ये आतापर्यंत चेनचोरीचे ३२ गुन्हे उघडकीस आणले असून, ५० लाख ६३ हजार रुपये किमतीचे ४१ तोळे सोने हस्तगत केले आहे. या गुन्ह्यांचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीचा वापर करण्यात आला.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, रावसाहेब मोटे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, महेश खांडे, अंमलदार नितीन लोखंडे, अंमलदार सोमनाथ मोरे, नितीन उमरजकर तसेच मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी केली.