

पिंपरी: चाकण एमआयडीसी परिसरातील चिंबळी फाटा येथे असलेल्या पॉलिमार्क इंडस्ट्रीज कंपनीला बुधवार (दि. ९) सकाळी भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने ज्वाळा लगतच्या कंपन्यांपर्यंत पोहोचल्या. मात्र, पीएमआरडीएसह विविध अग्निशमन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंबळी फाटा येथील शांताई लॉन्सजवळ पॉलिमार्क इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. बुधवारी सकाळी कंपनीत अचानक आग लागली. कंपनीत पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य असल्याने काही वेळातच आगीची तीव्रता वाढली. आगीच्या उंच ज्वाळा आणि धुराचे मोठे लोट दूरवरून दिसत होते. आगीने लगतच्या कंपन्यांनाही विळखा घालण्यास सुरुवात केल्याने परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मारुंजी आणि वाघोली अग्निशमन केंद्रातील जवान अग्निशमन वाहनांसह घटनास्थळी दाखल झाले. आगीची व्याप्ती पाहता पिंपरी-चिंचवड महापालिका, आळंदी नगरपरिषद आणि एमआयडीसी अग्निशमन दलाचीही मदत मागविण्यात आली. त्यानंतर सर्व यंत्रणांनी संयुक्तपणे चारही बाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला.
पीएमआरडीएचे सहाय्यक केंद्र अधिकारी एल. व्ही. बेदरे आणि चाकण एमआयडीसी केंद्राचे अग्निशमन अधिकारी व्ही. व्ही. तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली आगीवर नियंत्रण आणण्याचे काम करण्यात आले. पीएमआरडीएचे जवान दिग्विजय नलवडे, साईनाथ मोरे, अभिषेक पवार, शुभम पोटे, केतन आवसरमल, उमेश फाळके, ओमकार रणवरे आणि शंतनू गायकवाड यांच्यासह विविध अग्निशमन दलांच्या जवानांनी आगीवर सातत्याने पाण्याचा मारा केला.
आगीची तीव्रता आणि लगतच्या कंपन्यांना असलेला धोका लक्षात घेऊन अग्निशमन जवानांनी आग पुढे पसरू नये, यावर लक्ष केंद्रित केले. वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे आग आणखी कंपन्यांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान आणि संभाव्य जीवितहानी टळली. दरम्यान, अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले. या दुर्घटनेत नेमके किती आर्थिक नुकसान झाले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. तसेच, आग नेमकी कशामुळे लागली, हेही स्पष्ट झाले नसून त्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.