

दापोडी: शहरातील दापोडी परिसरातील आनंदवन येथे गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी-पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. आनंदवन हा परिसर प्रामुख्याने कुष्ठरोग्यांच्या वसाहतीसाठी ओळखला जातो. येथे अनेक वर्षांपासून अनेक रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय वास्तव्य करीत आहेत. परंतु, मागील पाच ते सहा दिवसांपासून येथे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिक त्रस्त आहेत. (Latest Pimpri chinchwad News)
नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून, त्याचा रंगही बदललेला आहे. अशा पाण्याचा वापर केल्यामुळे नागरिकांमध्ये पोटदुखी, उलट्या, जुलाब यांसारखे आजार उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या क्साहतीत राहणारे बहुतेक नागरिक अल्प उत्पन्न गटातील असून, त्यांचे दैनंदिन उत्पन्न मर्यादित आहे. त्यामुळे ते बाजारातून शुद्ध पाणी विकत घेऊ शकत नाहीत किंवा पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक साधने विकत घेणेही त्यांच्यासाठी कठीण आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून दूषित पाणी येत आहे का, की पाईपलाइनमध्ये गळती होऊन नालेतील पाणी मिसळत आहे, याची खात्री अद्याप झालेली नाही. काही नागरिकांनी सांगितले की, पाईपलाइन परिसरात अनेक ठिकाणी जुनी व गंजलेली आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता जास्त आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच, परिसरातील पाईपलाइन तपासणी करून ज्या ठिकाणी गळती आहे ती त्वरित दुरुस्त करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
आधीच शारीरिक व्याधींनी त्रस्त
दापोडी येथील आनंदवन ही वसाहतीत कुष्ठ रुग्ण आहेत. त्यांचे जीवन आधीच शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. दूषित पाण्यामुळे विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या भागातील पाणीपुरवठा सुरळीत आणि शुद्ध करणे गरजेचे आहे.
परिसरातील पाईपलाईनची पाहणी करून दोन दिवसात सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल. ज्या ठिकाणी गळती आहे ती थांबवली जाईल.
साकेत पावरा, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, ह प्रभाग अनेक दिवसांपासून अवेळी
पाणीपुरवठा व अस्वच्छ पाणीप-स्वठा होत आहे. या आनंदवन वस्तीतील नागरिक अगोदरच आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. या वस्तीत दूषित पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नरेश आनंद, दापोडी