

पिंपळे गुरव: शहरात इंटरनेट, वायफाय, टेलिव्हिजन, टेलिफोन अशा विविध सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या फायबर ऑप्टिकल केबलचे अनधिकृत जाळे शहरात दिवसेंदिवस वाढत चालले आहे; परंतु याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहे. इमारतीच्या छतांवर, झाडांवर, पथदिव्यांच्या खांबांवर, भिंतींवर आणि मोबाईल टॉवरवर या केबल लटकलेल्या दिसतात. काही ठिकाणी तर केबल रस्त्यात, पदपथावर पडल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. (Latest Pimpri chinchwad News)
स्थानिक केबल व्यावसायिक व विविध इंटरनेट कंपन्यांकडून ग््रााहकांपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी फायबर ऑप्टिकल केबलचा वापर केला जातो. मात्र, महापालिकेचे खोदाई शुल्क टाळण्यासाठी काही कंपन्यांकडून या केबल हवेतूनच टाकल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर गुंतागुंतीचे केबलजाळे निर्माण झाले आहे.
कासारवाडी रेल्वे स्टेशन परिसर वाहतुकीचा व मोठ्या प्रमाणात वर्दळीचा आहे. येथील रस्त्यावरच केबल पडल्याने दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या केबलवरून अनेक वाहने ये जा करीत असतात. एखादी केबल वाहनाच्या चाकामध्ये अडकल्यास गंभीर अपघात होऊ शकतो. दिवसा त्या केबल दिसतात मात्र रात्रीच्या अंधारात त्या केबल दिसून येत नाहीत. त्यामुळे गंभीर अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या तरी या अनधिकृत केबलविषयी ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने शहरातील केबलचे अनधिकृत जाळे तातडीने हटवून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे
महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या कडेला पादचाऱ्यांसाठी पदपथ उभारण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पथदिवे उभारण्यात आले आहेत. तसेच रस्ता दुभाजकांमध्येदेखील पथदिवे उभारण्यात आले आहेत. परंतु, हे पथदिवे अनधिकृत फायबर केबल टाकण्याचे खांब बनले आहेत. यामुळे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, असा प्रश्न नागरिक करत आहेत. विद्युत तारांचे जाळे कमी करण्यासाठी तसेच सुरक्षेसाठी भूमिगत केबल तसेच इतर केबल भूमिगत करण्याचा निर्णय शासन व स्थानिक प्रशासन घेत आहे; परंतु राजरोसपणे दिवसाढवळ्या शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्याकडे मात्र महापालिका प्रशासन डोळेझाक करत आहे. याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
अनधिकृत केबल नेटवर्कमुळे महापालिका प्रशासनालादेखील कर मिळत नाही. तसेच शहराच्या सौंदर्यास बाधा येत आहे. शहरातील प्रत्येक भागात झाडांवर, पथदिव्यांवर मोठ्या प्रमाणात या अनधिकृत केबलचे जाळे निर्माण झाले आहे. बर्ऱ्याच केबल तुटून रहदारीच्या मार्गावर येत आहेत. यामुळे पादचारी, वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अशा पद्धतीने शहराचे विद्रुपीकरण करणारांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
स्थानिक
उद्या संबंधित ठिकाणी केबल उचलण्यासाठी कर्मचारी पाठविण्यात येतील. तसेच शक्य तेवढ्या केबल काढून घेण्यात येतील. जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही.
सुभाष चव्हाण, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड मनपा.