

संतोष शिंदे
पिंपरी : ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या टवाळखोर युवकांवर वाहतूक पोलिसांनी शिस्तीचा बडगा उगारला आहे. मागील नऊ महिन्यांत पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी तब्बल 55 हजार 547 ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाई करून साडेपाच कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच शहरात वाहतुकीची शिस्त निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे.(Latest Pimpri chinchwad News)
वाहतूक नियमांचे पालन ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची कर्तव्य भावना असावी. तरुण मुलांना वाहन देताना पालकांनी त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवावे, ट्रिपल सीट किंवा हेल्मेटविना प्रवासावर सक्त मनाई करावी. शिस्त पाळणारे नागरिक शहराच्या सुरक्षिततेचा खरा पाया आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीवर चालकासह केवळ एकच प्रवासी बसण्याची परवानगी आहे. तरीही अनेकजण, विशेषतः तरुण मंडळी, तीन जणांनी एकत्र प्रवास करणे थरार समजतात. मात्र, अशा थराराचा शेवट अनेकदा रुग्णालयात होतो. ट्रिपल सीट चालवताना वाहनाचा तोल बिघडतो, नियंत्रण सुटते आणि अपघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो.
वाहतूक पोलिसांकडून दररोज सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत वाहन तपासणी मोहिमा राबवल्या जातात. कागदपत्रांची पाहणी, हेल्मेटचा वापर, ट्रिपल सीट प्रवास आणि वाहतुकीतील शिस्त या सर्व बाबींची तपासणी केली जाते. नियमभंग करणाऱ्यांवर ई-चलानद्वारे तत्काळ कारवाई केली जाते. पोलिस अधिकारी सांगतात, ट्रिपल सीट हा केवळ नियमभंग नसून, स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळण्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाईसोबतच नागरिकांना जनजागृती करून जबाबदार वाहनचालक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वाहतूक विभागाने शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती उपक्रम सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना वाहतूक शिस्त, गतीमर्यादा, ट्रिपल सीट टाळणे, हेल्मेटचा वापर आणि वाहन चालवताना फोन न वापरणे याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाते. तसेच, औद्योगिक वसाहती आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही थेट संवाद साधून नागरिकांना जबाबदार चालक होण्याचे आवाहन केले जात आहे.
ट्रिपल सीट प्रवास टाळा
चालक आणि मागचा प्रवासी दोघांनीही हेल्मेटचा वापर करा
वाहन चालवताना फोन वापरू नका
गतीमर्यादा आणि सिग्नलचे पालन करा
वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा
ट्रिपल सीट चालवताना दुचाकीवरील नियंत्रण सुटण्याचा धोका जास्त असतो. हेल्मेट न वापरल्यास मेंदूला दुखापत होऊन मृत्यूपर्यंत परिस्थिती पोहचू शकते. काही क्षणांचा आनंद किंवा मस्ती म्हणून घेतलेला निर्णय अनेकदा आयुष्यभराचा पश्चात्ताप देऊन जातो. त्यामुळे प्रत्येकाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
डॉ. विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड