

दापोडी: उद्योगनगरीचा स्मार्ट सिटीमुळे चेहरामोहरा बदल असतानाच दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मात्र 20 वर्षांहून अधिक काळ जुनी झालेली विद्युत यंत्रणा अपघाताला निमंत्रण देत आहे. येथील रोहित्राचे खांब, विद्युत वाहिनी, डीपी बॉक्स जीर्ण झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना अपघाताचा धोका होऊ शकतो. यामुळे येथील विद्युत यंत्रेणेत बदल करणे काळाची गरज आहे.
दापोडी येथील डीपी बॉक्स, रोहित्र आणि विजेच्या केबल्सची दुरवस्था झाली आहे. विशेषतः दापोडीतील मुंबई कॉलनी आणि पवना घाट हा परिसर दाट लोकवस्तीचा आणि वर्दळीचा असून, येथील उघड्यावर डीपी बॉक्स, रोहित्रावर झाडांच्या फांद्या अडकलेल्या आहेत. यामुळे पावसाळ्यात शॉर्ट सर्किट होऊन मोठी आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरगुती कनेक्शनसाठी वापरले जाणारे डीपी बॉक्स खालच्या बाजूने पूर्णपणे गंजले असून, पावसाचे पाणी शिरल्याने वारंवार तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता आहे. प्रशासनाला जाग येण्यासाठी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जात आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
फुगेवाडी परिसरातील स्थितीही सारखीच असून, जुन्या झालेल्या डीपी बॉक्समुळे वीजपुरवठा अनेकदा खंडित होतो. एकीकडे महावितरण स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची सक्ती नागरिकांना करत आहे. दुसरीकडे मात्र जुनाट यंत्रणा सुधारण्याकडे दुर्लक्ष करत आहे. या असुरक्षित यंत्रणेमुळे वीजचोरीचे प्रमाणही वाढले आहे.
उघड्या तारा आणि जमिनीलगत असलेले गंजलेले डीपी बॉक्स यामुळे लहान मुले आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, आता दापोडी-फुगेवाडीतील नागरिकांनी पारंपरिक लोखंडी बॉक्सऐवजी गंज न पकडणारे फायबरचे किंवा गॅल्व्हनाइज्ड मफसेन्सर रोहित्रफफ बसविण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यापूर्वी या सर्व जुन्या केबल्स आणि गंजलेले डीपी बॉक्स बदलून अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
पावसाळ्यात दापोडीत वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. गावठाण परिसरातील डीपी बॉक्स धोकादायक स्थितीत असून, ते तातडीने बदलण्याची गरज आहे. अन्यथा एखाद्या नागरिकाला शॉक लागून अपघात होऊ शकतो.
रवींद्र कांबळे, मैत्री ग््रुाप, दापोडी
दापोडीतील मुंबई कॉलनी व पवना घाट परिसरातील रोहित्रांची पाहणी करण्यात येईल. परिसरातील जुन्या डीपी बॉक्सचे सर्वेक्षण करून अहवाल देणार आहे. लगेचच कार्यवाही सुरू केली जाईल.
अनिल मुलगीर, सहाय्यक अभियंता