

पिंपरी: बनावट चावीचा वापर करून घरफोडी करणाऱ्या महिलेला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी 13 लाख 87 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
सारिका संतोष भुजबळ (38, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी एका महिलेच्या घरातून भर दिवसा 10 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली.
तपासादरम्यान संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. फिर्यादीच्या घराची माहिती असल्याचा फायदा घेत तिने बनावट चावी तयार करून घरात प्रवेश केला आणि दागिने चोरून नेल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांनी आरोपी महिलेकडून चोरीला गेलेले सर्व दागिने जप्त करत गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे अल्पावधीत कारवाई करत पोलिसांनी कामगिरी बजावली.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांच्या पथकाने केली.