

पिंपरी: आमचे काही जवळचे सहकारी चुकीचा सल्ला देत आहेत. ते त्यांनी ताबडतोब थांबवावे, अन्यथा त्यांना मला थांबवावे लागले. मी पद देऊ शकतो. तसे दिलेले पद काढू शकतो. वेगळे काही सांगत असले तर, फोन टेप करा. मी बघतो. काय भानगड आहे ती. त्याना असे सरळ करतो की, पुढील सात पिढ्या ते तसे फोन करणार नाहीत, असा निर्वाणीचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी येथील शेवटच्या सभेत दिला होता.
दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी प्रभाग क्रमांक 30 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रचार संपण्याच्या दिवशी 13 जानेवारीला दुपारी साडेतीनला ती सभा झाली. ती शहरातील अजितदादांची शेवटची सभा ठरली. त्या दिवशीची त्यांची ती पिंपळे गुरव, भोसरीनंतरची तिसरी सभा होती.
अजितदादा म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख आहे. मी सांगेल, तसेच करा. कोणी चुकीचे काय करत असेल तर, निर्वाणीचा इशारा द्यायचा आहे. माझ्याकडे अनेक जण लायनीत उभे आहेत, संधी द्या म्हणून. वेगळे काही सांगत असेल तर फोन टेप करा. मी बघतो. काय भानगड आहे ते. त्यांना सरळ करतो, असा इशारा त्यांनी पक्षातील सहकाऱ्यांना दिला.
शिवनेरी जिल्हा करण्यास विरोध नाही
शिवसेना नवीन जिल्हा करून पिंपरी-चिंचवड त्यात महत्त्वाचे ठिकाण करण्यास माझा विरोध नाही. जनतेची मागणी असल्यास लोकप्रतिनिधी त्याला पाठींबा देतात. कुलाबाचे राजगड, उस्मानाबादचे धाराशीव, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नाव बदल झाले आहेत. भावनिक मुद्दा काढून दोन समाजात तेढ निर्माण केला जात आहे. स्वत:च्या चुका झाकण्यासाठी जातीय रंग दिला जात आहे. एकाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भावनिक करून मुलांना रोजगार मिळणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. मी जातीभेद पाळत नाही. सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
बाबासाहेबांमुळे मताचा अधिकारी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वांत उत्कृष्ट असे संविधान व घटना लिहिली. त्यामुळे आपण एकोपाने राहत आहोत. अडानी, अंबानी व बिर्ला यांना एकच मत देता येते. त्यामुळे समाजातील शेवटच्या माणसालाही एक मत देता येते. ही किमया बाबासाहेबांनी केली आहे. पैसा आणि सत्तेचा माज दाखवत तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यातून एका दिवसाचा प्रश्न सुटेल. मात्र, पुढे कर्जबाजारी व्हावे लागेल. शहराचा विकास होणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
1991 ला दादांची पहिली सभा
सन 1991 च्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी अजित पवार पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्या वेळी बारामती मतदारसंघात पिंपरी-चिंचवडचा समावेश होता. अजित पवार हे स्वत: काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांची पिंपरी येथे पहिली सभा झाली. त्या सभेला नानासाहेब शितोळे, आझम पानसरे, तात्या कदम, लक्ष्मण जगताप, विलास लांडे आदी उपस्थित होते. त्या निवडणुकीत अजित पवार हे पहिल्यांदा विजयी झाले आणि खासदार झाले. पुढे शरद पवार यांच्यासाठी अजितदादा यांनी ती जागा सोडली. तेव्हापासून दादा हे पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष घालू लागले.