Pimpri Chinchwad NCP Leadership: अजित पवारांनंतर पिंपरी-चिंचवडचे सूत्रे कुणाकडे?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व, गटनेता आणि भविष्यातील समीकरणांवर चर्चा रंगात
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाल्याने आता शहराची सूत्रे कोणाच्या हातात जाणार?, याची चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. पवार कुटुंबातील कोणाकडे पिंपरी-चिंचवडची जबाबदारी दिली जाते की, खासदार, आमदार किंवा स्थानिक नेत्याकडे जबाबदारी सोपवली जाते, याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Ajit Pawar Last Speech: दापोडीतील शेवटच्या सभेत अजितदादांचा कडक इशारा; “चुकीचा सल्ला देणाऱ्यांना सरळ करीन”

शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच भाजपचा कट्टर वैरी होता. राज्यातील समीकरणे बदलल्याने विरोधात असलेली राष्ट्रवादी महायुतीत भाजपसोबत एकत्र झाली. अशी स्थिती असली तरी शहरातील पदाधिकाऱ्यांचे कधी मनोमिलन झाल्याचे दिसून आले नाही. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपपासून दोन हात दूरच राहण्याचा प्रयत्न करतात. महापालिकेतील आयुक्त तसेच, अधिकारी फारशी दखल घेत नसल्याने तसेच, प्रभागातील कामे होत नसल्याने नगरसेवक व पदाधिकारी अस्वस्थ होते. पक्षात फारसा उत्साह नव्हता.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Ajit Pawar Tribute: अजितदादांच्या जाण्याने सामाजिक पोकळी; पिंपरी-चिंचवडकरांच्या भावना शब्दात

नऊ वर्षांनी झालेली महापालिका निवडणूक अजित पवारांनी स्वत: ताब्यात घेतली. महापालिकेतील भ्रष्टाचार तसेच, गैरव्यवहार बाहेर काढत, भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर थेट आरोपाच्या फेऱ्या झाडल्या. प्रचारात त्यांनी तोच मुद्दा प्रकाशझोतात ठेवला. मात्र, त्या लढाईत अजित पवारांना शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी साथ दिली नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले. नातेगोते, गावकी-भावकी, नातेसंबंध तसेच, व्यावसायिक संबंध सांभाळत कोणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर थेट आरोप करण्याची हिंमत दाखवली नाही. पक्षातील अनेक दिग्गज व अनुभवी माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने तसेच, पक्षसंघटन मजबूत नसतानाही अजितदादांना मोठी उभारी दिली. अजितदादांनी आक्रमक भूमिका घेत संपूर्ण शहर पिंजून काढले. त्यामुळे अनेक उमेदवारांना चांगलेच स्फुरण मिळाले आणि राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Ajit Pawar Pimpri Chinchwad: रॉक्सी चौकातील पहिली भेट ते लोकनेतेपणापर्यंत: पिंपरी-चिंचवडच्या आठवणींतला अजितदादा

आता, अजितदादा हयात नसल्याने शहराची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर पडणार याची चर्चा होत आहे. अजितदादांसारखा कणखर नेता शहरात नाही. त्यामुळे कोणाच्या गळ्यात नेतृत्वाची माळ पडणार त्याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. दुसरीकडे, पवार कुटुंबांतील सदस्याकडे पिंपरी-चिंचवडची जबाबदारी दिली जाईल, असेही राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे. त्यात अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे यांची नावे समोर येत आहेत.

महापालिका गट नेत्याची निवड प्रलंबित

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 37 नगरसेवक निवडून आले आहेत. त्या नगरसेवकांचा गटनेता निवडणीची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. गटनेता हा महापालिका विरोधी पक्षनेता असणार आहे. त्यामुळे त्या पदाला महत्व आहे. तसेच, स्थायी समितीमध्ये 16 पैकी राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना सदस्य म्हणून संधी मिळणार आहे. तसेच, शिक्षण, विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, क्रीडा या विषय समित्यांमध्ये राष्ट्रवादीचे प्रत्येकी 3 नगरसेवकांना सदस्य म्हणून संधी मिळणार आहे. तसेच, महापालिकेत पक्षाचे तीन स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. त्याचीही निवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी पक्षश्रेष्ठींना निर्णय घ्यावा लागणार आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार?

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. अजित पवारांसह युवा नेते रोहित पवार व खासदार अमोल कोल्हे यांनी शहरात एकत्रित प्रचार केला. महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र आल्याने तसेच, अजित पवार हयात नसल्याने आता, दोन्ही पक्ष कायमचे एकत्र होतील, अशी चर्चा शहरात सुरू आहे. पक्षांची विभागलेली ताकद एकत्र येईल. त्याचा फायदा पक्ष संघटनेला होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांची पक्षाला साथ मिळू शकते.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Ajit Pawar Pimpri Chinchwad Police: अजित पवारांचा पिंपरी-चिंचवड पोलिस दलाला खंबीर आधार; दादांच्या जाण्याने हळहळ

महापालिकेतील पक्षाच्या गटनेत्याची निवड केली जाईल. त्यावर लवकरच पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेतला जाईल. पिंपरी-चिंचवड शहराचे नेतृत्व कोणाकडे दिले जाईल, याबाबत आताच बोलणे योग्य ठरणार नाही. योग्य वेळी त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.

विलास लांडे, माजी आमदार

अजितदादा यांचे आकस्मित निधन झाले आहे. आता, पिंपरी-चिंचवड शहराचे नेतृत्व कोण करणार, हे त्यांचे कुटुंबीय ठरवतील. मी पक्षाचा शहराध्यक्ष या नात्याने स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ शकतो. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा गटनेता निवडणुकीची प्रक्रिया वहिनी सुनेत्रा पवार तसेच, प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून घेतला जाईल.

योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पिंपरी-चिंचवड शहराचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे, यांचा निर्णय पवार कुटुंबीय घेतील. एकत्र बसून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यासंदर्भात आम्ही बोलणे योग्य नाही. महापालिकेच्या गटनेत्याबाबतही निर्णय घेतला जाईल. त्याची कागदोपत्री सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news