

पिंपरी: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शाळा नोंदणी प्रक्रिया 9 जानेवारीपासून सुरू झाली आहे. दुसऱ्यांदा मुदतवाढ देवूनही 296 शाळांपैकी फक्त 156 शाळांनीच आरटीईसाठी नोंदणी केली आहे.
आकुर्डी विभागात 97 शाळांची नोंदणी
शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव 25 टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रिया लागू असणाऱ्या शाळांची नोंदणीकडे पाठ असल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये आकुर्डी विभागातून आरटीईअंतर्गत येणाऱ्या 177 पैकी 97 शाळांनी नोंदणी केली आहे.
तर, पिंपरी विभागामधून 119 पैकी 59 शाळांनी नोंदणी केली आहे. शाळा नोंदणी झाल्यानंतर प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. मात्र, दुसऱ्यांदा मुदतवाढ देवूनही नोंदणीला शाळांचा कमी प्रतिसाद लाभला आहे.
दरवर्षी पहिल्या टप्प्यामध्ये कधीच शाळांची नोंदणी होत नाही. त्यामुळे यंदाही शाळा नोंदणीस मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. आरटीईअंतर्गत शहरातील शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सर्व शाळांचे मॅपिंग होईल. त्यानंतर आरटीईतून प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवून घेतले जातील. विद्यार्थ्यांना शाळांचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल आणि त्यानुसार त्यांना संबंधित शाळांमध्ये प्रवेश मिळतील.
शाळांचे दुर्लक्ष
दरवर्षी दिलेल्या मुदतीमध्ये शाळा कधीच नोंदणी करत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी मुदतवाढ दिल्याने आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक विस्कळीत होते. शाळा नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. नोंदणीसाठी अजूनही काही शाळांकडून निरूत्साह असल्याचे स्पष्ट होत आहे. आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून वेळेत मिळत नसल्याच्या कारणावरून काही शाळा नोंदणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते आहे.