

पिंपरी: नगरसेवकांच्या संख्येनुसार महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजपचे सर्वांधिक 11, राष्ट्रवादीचे 4 आणि शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) 1 नगरसेवक असणार आहे. महापालिकेत अस्तित्वात असलेल्या तीनही पक्षाला स्थायी समितीचे सदस्यत्व मिळणार आहे. मात्र, नगरसेवक संख्या कमी असल्याने विविध विषय समित्यांमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना संधी मिळणार नाही.
महापालिकेच्या निवडणुकीत 84 नगरसेवक निवडून आल्याने भाजपची एकहाती सत्ता आली आहे. एक अपक्ष नगरसेवक भाजपसोबत आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 37 आणि शिवसेनेचे 6 नगरसेवक आहेत. असे महापालिकेतील नगरसेवकांचे बलाबल आहे. स्थायी समितीकडून हिरवा कंदील दिल्यानंतरच पालिकेची विकासकामे मार्गी लागतात. पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या समितीकडे असतात. त्यामुळे या महत्वाच्या समितीवर वर्णी लागावी म्हणून सर्वच नगरसेवकांचा आग्रह असतो. त्यासाठी पक्षश्रेष्ठींसह स्थानिक लोकप्रतिनिधींकडे त्यासाठी मनधरणी केली जात आहे.
विधी समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, शिक्षण समिती, महिला व बालकल्याण समिती अशा विविध 5 विषय समित्या आहेत. या विषय समितीमध्ये प्रत्येकी 9 नगरसेवक सदस्य असतात. त्या समितीमध्ये भाजपचे 6 आणि राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक सदस्य असणार आहेत. नगरसेवक संख्या कमी असल्याने शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) नगरसेवकांना त्या समितीमध्ये संधी मिळणार नाही.
अद्याप भाजप, राष्ट्रवादीची नोंदणी नाही
निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांचा पक्षनिहाय स्वतंत्र गट करुन त्यांची पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करणे आवश्यक असते. शिवसेनेची (एकनाथ शिंदे) नोंदणी झाली असून, गटनेतेपदी विश्वजित बारणे यांची निवड झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नोंदणी होणे अद्याप बाकी आहे. त्या गटांची नोंदणी झाल्यानंतर सत्तारूढ पक्षनेता आणि विरोधी पक्षनेत्याचे नाव समोर येऊ शकते.
महापौराचे नाव सोमवारी समोर येणार
महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा पुढील शुक्रवारी (दि. 6) सकाळी अकराला महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केली आहे. त्यासाठी येत्या सोमवारी (दि. 2) दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्या दिवशी सत्ताधारी भाजपकडून ज्या नगरसेवकाकडून उमेदवारी अर्ज सादर होईल, तो महापालिकेचा नवीन महापौर असेल. महापौर पदाचे नाव त्या दिवशी अधिकृतरित्या समोर येईल.
महापालिकेकडून महापौर निवडीची प्रक्रिया सुरू
महापालिका प्रशासनाकडून महापौर निवड प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृह स्वच्छ करून घेण्यात येत आहे. तसेच, महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता, सत्तारूढ पक्षनेता, गटनेता, स्थायी समिती अध्यक्ष तसेच, विविध विषय समिती सभापती यांची दालने स्वच्छ करून आवश्यक ती दुरुस्ती कामे करून घेण्यात येत आहेत. पुणे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली 6 फेब्रुवारीला विशेष सभा आयोजित केली आहे. त्या सभेत महापौर पदाची निवड केली जाईल. तर, महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज 2 फेबु्रवारीला दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत नगर सचिव विभागात स्वीकारले जाणार आहेत, असे महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.