

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपाचा झेेंडा फडकविण्यासाठी पक्षाने आयारामांसाठी प्रवेशद्वारे खुली ठेवली आहेत. मात्र, या आयारामांमुळे अनेक निष्ठावंतांच्या आशेवर पाणी फिरणार आहे. त्यामुळे सर्वात शिस्तीचा समजल्या जाणाऱ्या पक्षात नाराजांची संख्या वाढली असल्याचे चित्र आहे. अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या निवडणुकीच्या लढतीमध्ये नाराजांकडून बंडखोरी होण्याची शक्यता वाढली आहे. ही बंडखोरी न शमविल्यास पक्षाच्या वरिष्ठांसाठी निवडणुकीत डोकेदुखी ठरणार आहे.
शतप्रतिशत भाजपाचा नारा देत शंभरी पार करण्याच्या घोषण मागे पडत आता अब की बार 125 असा ढोल बडवला जात आहे. प्रत्यक्षात भाजपामध्ये आधीच उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या अधिक असताना आता नव्याने जवळपास 50 हून अधिक प्रवेश झाले आहेत. त्यामुळे विविध प्रभागात नाराजी उफाळली आहे. गेल्या 9 वर्षापासून प्रभागात नगरसेवक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. शहरातील वाकड, थेरगाव या प्रभागात सुरु झालेल्या नाराजीचे लोण पाहाता पाहता अनेक प्रभागात पसरले आहे. एवढेच नव्हे, तर रस्त्यावर उतरुन विरोधही दर्शविला जात आहे; मात्र वरिष्ठ नेत्याने किंबहुना पक्षाने ते ‘सिरीयस’ घेतले नसल्याचे दिसून येते.
दरम्यान, भाजपाला गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2017 मध्ये 9, 12, 14 आणि 25 या प्रभागांमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. विशेष म्हणजे या ठिकाणी दाट लोकवस्ती आणि पक्षाला मानणारा मोठा वर्ग देखील होता. तर, 20, 21, 24 आणि 23 या ठिकाणी एका जागेवर समाधान मानावे लागले होते. सेक्टर 15 या ठिकाणी भाजपाचा बालेकिल्ला समजला जात असूनही,केवळ दोनच जागा मिळावल्याने माजी शहराध्यक्षांनी कार्यकर्त्यासमोरच खंत व्यक्त केली होती.
सद्यस्थितीत नव्याने प्रवेश झाल्याने प्रभाग वाकडमधील 22 ते 24 तसेच, भोसरीतील प्रभाग 5, चिंचवडमधील प्रभाग 14 या ठिकाणी देखील पक्षाने ताकद वाढवली आहे. पण, यापूर्वी भाजपा म्हणून विरोधात पराभूत झालेले व अगदी तिसऱ्या नंबरवर फेकले गेलेल्या इच्छुक उमेदवारांना ठेच लागली आहे. परिणामी, ते आतपासून बंडाची तयारीत असल्याचे बोलले जात आहेत. तर, काहींनी एकाच रात्रीत स्थानिक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
अन्य पक्षांचे प्रवेश राहणार खुले, मात्र...
निवडणुकांच्या तोंडावर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यासह शिवसेना शिंदे गटाकडे इच्छुकांचे पर्याय खुले आहेत. परंतु, या तिघांशिवाय उरलेले म्हणजेच काँग्रेस, समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उबाठा गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन मुक्त पार्टी, बहुजन समाज पक्ष असे विविध पर्याय इच्छुकांना खुले आहेत; परंतु पुन्हा पक्षात येण्यासाठीचा आटापीटा करण्यापेक्षा सेफ म्हणून अपक्ष लढण्याची तयारी अनेकांनी केली आहे.