

पिंपरी: श्रीमान महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर तसेच, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह असलेला हा प्रभाग असून, भाजपकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरी होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रभागात लक्ष केंद्रीत केल्याने येथील लढतीबाबत उत्सुकता आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपाचे सुरेश भोईर व राजेंद्र भोईर, शिवसेनेतून भाजपात आलेल्या माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे राष्ट्रवादी काँग््रेास माजी महापौर अपर्णा डोके असे संमिश्र पॅनेल निवडून आले होते. भाजपाकडून सुरेश भोईर, राजेंद्र भोईर, अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, विजय गावडे, महेश कुलकर्णी, विठ्ठल भोईर, मधुकर बच्चे, मनीषा भोईर, पल्लवी भोईर, उज्ज्वला गावडे असे इच्छुक आहेत. माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक अनंत कुऱ्हाळे व इतर राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाकडून सागर चिंचवडे इच्छुक आहेत. मनसेकडून शैलेश पाटील इच्छुक आहेत. हा भाग भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने भाजपाला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. तर, विरोधातील दोन्ही राष्ट्रवादी व इतर पक्षांची जोर लावला आहे. कोणी बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
प्रभागातील परिसर
एसकेएफ कॉलनी, रस्टन कॉलनी, पवनानगर, वेताळनगर, चिंचवड गावठाण, केशवनगर, तानाजीनगर, काकडे पार्क, मोरया राज पार्क, दर्शन हॉल, माणिक कॉलनी, लक्ष्मीनगर, यशोपुरम सोसायटी आदी
ऐतिहासिक चापेकर स्मारकाचे काम पूर्ण
अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक तसेच, चौकांचे सुशोभिकरण केले आहे. चिंचवड येथील पीएमपी बस स्थानक विकसित करण्यात आले आहे. क्रांतिवीर चापेकर स्मारक व वाडा विकसित केला आहे. चिंचवड व थेरगावला जोडणारा उड्डाणपुलाचे (बटरफ्लाय बिज) काम झाल्याने जवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे. ब क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज एल्प्रो मॉलमागील नवीन इमारतीत सुरू झाले आहे. जुन्या ड्रेनेजलाईन बदलण्यात आल्या आहेत. काही भागांत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. वीस लाख लिटर क्षमतेची नवीन टाकी उभारण्यात आली आहे.
तालेरा रुग्णालयाचे नूतनीकरण करून 160 बेड क्षमतेचा विस्तार करण्यात आला आहे. केशवनगर शाळेची धोकादायक इमारत पाडून नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. मुरलीधर गावडे ऑक्सिजन पार्कमध्ये 2 हजार झाडे लावण्यात आले आहेत. एम्पायर इस्टेट पुलावरून लिंक रोडवर दोन्ही रॅम्प केल्याने वाहनचालकांची सोय झाली आहे. वेताळनगर झोपडपट्टीत एसआरए योजना राबविण्यात आली आहे. टेबल टेनिसचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रभागात ठिकठिकाणी ओपन जीमचे सुरू केले आहे. केशवनगर येथील गावडे जलतरण तलावाची दुरूस्ती करून तो खुला करण्यात आला आहे. नदीच्या कडेने रस्ता विकसित करण्यात येत असल्याने मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-ओबीसी महिला
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
‘डीपी’मध्ये निळीपूर रेषा बदलल्याने रिडेव्हल्पमेंटला खो
झपाट्याने विकसित होत असलेला हा भाग आहे. हाऊसिंग सोसायट्यांची संख्या मोठी आहे. बैठे घरे वाड्याच्या ठिकाणी रिडेव्हल्पमेंट होत आहे. दाट लोकवस्तीमुळे पार्किंगची समस्या मोठी आहे. गजबजलेले रस्ते, शॉपींग मॉल, मंदिर, रुग्णालय व शैक्षणिक संस्था, टोलेजंग निवासी इमारती आदीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. महापालिकेच्या डीपी आराखड्यात पवना नदीची निळी पूर रेषा बदलल्याने अनेक हाऊसिंग सोसायट्यांचे रिडेव्हल्पेंटला अडचणी निर्माण जाल्या आहेत. पावसाळ्यात पुराचे पाणी काही हाऊसिंग सोसायटी शिरते. पाणी कमी दाबाने व अपुरा होत असल्याने सोसायटीधारक त्रस्त आहेत. तालेरा रुग्णालयात बेडची संख्या कमी असल्याने रुग्णांना इतर रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात.