

पिंपरी: भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे व भारतीय रिपब्लिकन पार्टी (आठवले) पक्षाच्या महायुतीचा फॉर्मुला अखेर फायनल झाला आहे. तर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेचे आघाडीचे गणित जुळले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असले, तरी उमेदवारी यादीची प्रतीक्षा अद्याप कायम असल्याने इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे.
तब्बल 9 वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. सर्वच पक्ष महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी सरसावले आहेत. तसेच, इच्छुकांची संख्याही भरमसाठ आहे. सत्ताधारी भाजपासह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांचा ओढा अधिक असल्याचे दिसत आहे. युती व आघाडीवर तोडगा निघत नसल्याने एकाही प्रमुख पक्षाने उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. उमेदवारी अर्ज भरण्यास चार दिवस झाले तरी, यादी प्रसिद्ध न केल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे. त्यामुळे यादीवरून प्रचंड उत्सुकता ताणली गेली आहे.
भाजपा व शिवसेना युती अंतिम झाली आहे. भाजपाचे सर्व 128 जागांवर उमेदवार निश्चित केले होते. युतीवर शिक्कामोर्तब झाल्याने अनेक जागा भाजपाला सोडाव्या लागणार आहेत. भाजपा 112 जागेवर लढणार आहे. शिवसेनेला 13 जागा सोडण्यात येणार आहेत. तर, आरपीआयला 3 जागा असा फॉर्म्युला फायनल झाल्याचे सांगितले जात आहे. आरपीआय भाजपाच्या चिन्हावर लढणार आहे. भाजपाने कोणत्या 16 जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी रविवार (दि. 28) जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येत आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्यात जागांचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. कोणत्या पक्षाला किती जागा सुटणार याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काही जागांवर ठाम असल्याने पेच असून, तो सोडवला जाईल, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काही प्रभागात चार उमेदवारांचे पॅनेल जाहीर करून प्रचाराचा नारळही फोडला आहे. प्रचाराचा जोर रंगला आहे. त्यामुळे जागा वाटपाचे समीकरण कसे असेल, त्याची उत्सुकता आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि काँग्रेसची आघाडीही निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस समविचारी मित्रपक्षासोबत आघाडी करणार आहे. काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नसल्याचे घोषित केले आहे. काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. आघाडीचे जागा वाटपही अंतिम टप्यात आल्याचे महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.