

पारगाव: आंबेगाव तालुक्यात उसाच्या पिकावर हवामान बदलाचा मोठा परिणाम दिसून येत असून, अनेक ठिकाणी उसाला वेळेपूर्वीच तुरे आल्याचे आढळून येत आहे. या परिस्थितीमुळे उसाच्या वजनात घट होण्याची भीती ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
उसासह गहूपिकावर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. अनेक शेतांमध्ये गव्हावर तांबेरा तसेच काळा मावा यांसारख्या रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी तालुक्यातील शेतकरी सध्या चिंतेत सापडले आहेत.
साधारणपणे ऊसपिकाला तुरे येणे हे उत्पादनाच्या दृष्टीने घातक मानले जाते. तुरे आल्याने उसातील साखरेचे प्रमाण कमी होते, तसेच कांड्यांची वाढ खुंटते. परिणामी उसाच्या वजनात घट होऊन एकूण उत्पादनावर परिणाम होतो. याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर बसणार आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांच्या मते, यंदा उसाच्या पिकाला लागवडीपासूनच प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला आहे. कधी अचानक तापमानात वाढ, कधी कडाक्याची थंडी, तर कधी ढगाळ हवामान व दाट धुके अशा अस्थिर हवामानामुळे उसाच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम झाला असून, त्यामुळे तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे.
ऊस हे दीर्घकालीन पीक असल्याने त्यावर कोणताही परिणाम भरून काढणे शेतकऱ्यांसाठी कठीण ठरते. उत्पादनात घट झाल्यास साखर कारखान्यांना पुरविल्या जाणाऱ्या उसाच्या वजनावरही त्याचा परिणाम होणार आहे.