

वडगाव मावळ : निवडणुकीत मिळालेल्या विजयाने हुरळून जाऊ नका, लोकांनी तुम्हाला सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे. चुकीचे काम केले तर तुमची आणि पक्षाची बदनामी होते. त्यामुळे चुकीच्या गोष्टींना अजिबात थारा देऊ नका, अशी सक्त ताकीद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ तालुक्यातील लोणावळा, तळेगाव दाभाडे नगर परिषद, वडगाव मावळ नगरपंचायतमधील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिली.
जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान व पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे, गणेश आप्पा ढोरे, शंकरराव शेळके, महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत, साहेबराव कारके, काळूराम मालपोटे, सुरेश चौधरी, कृष्णा कारके, अशोक भेगडे, विलासराव काळोखे, सुरेश धोत्रे, भरत येवले, दीपक हुलावळे, अतुल वायकर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपल्या शहराचा विकास कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पहिल्या 100 दिवसांत काय काम करायचे याचे धोरण ठरवावे. शहरातील स्वच्छतेबाबत आग््राही भूमिका घ्यावी. लोकांनी आपल्याला सेवेसाठी निवडून दिले आहे याचे भान कायम ठेवून काम करताना पक्षभेद करू नये, अशा सूचना केल्या. प्रामुख्याने पिण्याचे पाणी, भुयारी गटर, घनकचरा व्यवस्थापन याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
मावळ तालुक्यात औद्योगिक, पर्यटन, कृषी अशा तीनही गोष्टींना वाव मिळाला पाहिजे त्यादृष्टीने नियोजन करू. आमदार शेळके यांच्या माध्यमातून माझी अनेक वर्षांची खंत तुम्ही भरून काढली. शब्द दिल्याप्रमाणे मी निधीही कमी पडू दिला नाही. तालुक्यात होणाऱ्या प्रकल्पांमुळे पर्यटन आणि रोजगारालाही वाव मिळणार आहे. मिसिंग लिंक, ग्लास स्काय वॉक, भंडारा डोंगराच्या पायथ्याला संतभूमी कॉरिडॉर अशा प्रकरणांमुळे मावळचे वैभव वाढणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी, लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद तसेच वडगाव नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा सन्मान या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या वेळी काँग््रेासची ज्येष्ठ नेते संभाजी राक्षे तसेच उत्तम सातकर, संतोष शिंदे, रोहित लांघे, भारत चिकणे, गणेश आहेर आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवक्ते राज खांडभोर यांनी केले तर आभार विठ्ठलराव शिंदे यांनी मानले.
जेव्हढा निधी दिला, तेव्हढे मताधिक्य जनतेने दिले! : आमदार शेळके
मावळच्या जनतेने राष्ट्रवादीचा आमदार देऊन दादांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनीही भरघोस निधी देऊन शब्द पूर्ण केला. या निधीच्या माध्यमातून झालेल्या कामांची जान ठेवून जनतेने साथ दिली. जितका निधी दिला, तितके मताधिक्य जनतेने या निवडणुकीत दिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असून, जनतेचा विश्वास सर्वांनी सार्थ ठरवावा, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.
जागतिक सायकल स्पर्धेमुळे मावळ जगात पोहचेल!
पुणे जिल्ह्यात होणारी जागतिक सायकल स्पर्धा ही मावळ तालुक्याच्या काही भागातून जात आहे. त्यादृष्टीने त्याभागातील रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. या स्पर्धेत जगभरातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यामुळे मावळचे नाव आणि मावळचे निसर्गसौंंदर्य जगभरात पोहोचणार असून, याचा फायदा मावळातील पर्यटनवाढीला होणारा असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी व्यक्त केला.