

नगर : भाजप जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील विद्यमान भाजप आमदार मोनिका राजळे यांच्याशी 'भावी'चा उडालेला संघर्ष हा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठीची पायाभरणी असल्याचे चित्र हळूहळू समोर येऊ पाहत आहे. पक्षाकडून पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह होत असताना त्यांनी मात्र शेवगाव-पाथर्डी विधानसभेसाठी इंटरेस्ट दाखविला आहे. आमदार मोनिका राजळे यांच्यासाठी '2024 चा पेपर अवघड' असे वृत्त 'पुढारी'ने गेल्या महिन्यातच प्रकाशित केले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत दिग्गजांना उतरविण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पंकजा मुंडे यांना बीडच्या रणांगणात उतरविण्याचा आग्रह भाजपकडून सुरू आहे.
संबंधित बातम्या :
मात्र मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत रस नाही. त्यांनी शेवगाव-पाथर्डीतून विधानसभा लढविण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे सूत्रांकडून समजते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मुंडे यांना राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळाले; मात्र त्यांचे मन तिकडे फारसे रमत नसल्याचे निकटवर्तीयांमध्ये बोलले जाते. राज्यातील बदलत्या समीकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावा-बहिणीच्या नात्यात पुन्हा गोडवा निर्माण झाला आहे. त्यातच धनंजय मुंडे यांना आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही मिळाले. बीडच्या राजकारणात मुंडे बंधू-भगिनींमधील संघर्ष दोघांनाही परवडणारा नाही, याची जाण असल्यानेच त्यांच्यात अलिखित करार झाल्याची चर्चा आहे.
विधानसभेसाठी धनंजय मुंडे परळीतून, बीड लोकसभेसाठी डॉ. प्रीतम मुंडे, तर शेवगाव-पाथर्डीतून पंकजा मुंडे असा हा अलिखित करार असल्याची चर्चा आहे. मुंडे बंधू-भगिनीचं ठरलं असलं, तरी पक्षाकडून मात्र पंकजा यांना बीडमधून लोकसभा लढविण्याचा आग्रह होत आहे. मात्र पंकजा यांना राष्ट्रीय राजकारणात रस नाही. त्या शेवगाव-पाथर्डीतून विधानसभेसाठी इंटरेस्टेड आहेत. तशी चर्चा त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांशी केल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे. पंकजा यांना शेवगाव-पाथर्डी विधानसभेची, तर डॉ. प्रीतम यांना बीड लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी 'राष्ट्रवादी'चे धनंजय मुंडे हेही भाजपच्या वरिष्ठांकडे शब्द टाकणार असल्याचे समजते.
आ. मोनिका राजळे यांच्यावर जाहीरपणे टीकास्त्र सोडणारे गोकुळ दौंड यांना गेल्या महिन्यातच भाजपने ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद बहाल करताच राजळे समर्थक पेटून उठले. त्यांनी दौंड यांच्या नियुक्तीला स्थगिती आणली. शेवगाव भाजप तालुकाध्यक्षपदी तुषार वैद्य यांची नियुक्ती जाहीर होण्यापूर्वीच थांबवावी लागली. हे राजकीय गुपीत आता उलगडू पाहतेय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करताच मोनिका राजळे यांना उमेदवारी मिळाली अन् त्या जिंकल्याही. 2019 च्या विधानसभेलाही भाजप उमेदवार म्हणून राजळे यांनी विजयी गुलाल घेतला. आता मात्र 2024 चा पेपर त्यांच्यासाठी अवघड मानला जातो. जिल्हा कार्यकारिणी जाहीर होताच भाजपांतर्गत उडालेला संघर्ष थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोर्टात पोहोचला. त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. मात्र हा संघर्ष कदाचित पंकजा मुंडे यांच्यासाठीची पायाभरणी तर नव्हती ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
संघर्षावेळी पाथर्डी पाठीशी !
ज्या-ज्या वेळी मुंडे कुटुंबीयांवर संघर्ष करण्याची वेळ आली, त्या-त्या वेळी पाथर्डी तालुका मुंडेंच्या पाठीशी उभा राहिला. मग तो गडाचा संघर्ष असो की पंकजा यांची संघर्षयात्रा असो. आताही पंकजा मुंडे यांना राजकीय करिअरमध्ये संघर्ष करावा लागत आहे. त्यात पाथर्डी तालुका मुंडेंच्या पाठीशी उभा राहील, असा दावा त्यांचेच समर्थक करत आहेत. विधानसभा निवडणुकी अगोदर लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्या वेळीच पंकजा यांचे मनसुबे समोर येतील. तोपर्यंत 'वेट अॅन्ड वॉच' अशी भूमिका आ. राजळे समर्थक घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
वेगळे पाऊल, की राजकीय पुनर्वसन
मोनिका राजळे या विद्यमान आमदार असून त्यांची ही दुसरी टर्म आहे. आता त्या तिसर्या टर्मच्या तयारीत आहेत. असे असतानाच पंकजा मुंडे यांची शेवगाव-पाथर्डीतील उमेदवारीची चर्चा त्यांच्यासाठी अस्वस्थता निर्माण करणारी आहे. या मतदारसंघात भाजपचा एक वर्ग आहे. तो उमेदवार न पाहता 'कमळ' पाहत असतो. त्यामुळेच आ. राजळे काही वेगळे राजकीय पाऊल टाकणार, की पक्षाकडूनच त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होणार, याची उत्सुकता नगरकरांना आहे.
कोथरूड पॅटर्नची चर्चा
हमखास निवडून येण्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची पद्धत तशी जुनीच आहे. गेल्याच विधानसभा निवडणुकीत भाजपने हा यशस्वी प्रयोग केला. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच कोल्हापुरातून थेट पुण्यात आणून 'हमखास यशाची खात्री' असलेल्या कोथरूडमधून उमेदवारी दिली. त्यासाठी तेथील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापले. चंद्रकांत पाटील अपेक्षेप्रमाणे विजयी झाले; पण नंतर मेधा कुलकर्णी राजकीय विजनवासात असल्यासारखी स्थिती निर्माण झाली. पुण्यातील एका कार्यक्रमात नुकतीच त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली, तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या घरी जाऊन समजूत घालावी लागली. पाथर्डीतही 'कोथरूड पॅटर्न' राबविला जाण्याची आणि त्यामुळे राजळे यांची अवस्था मेधा कुलकर्णी यांच्यासारखी होण्याची शंका व्यक्त होत आहे.