

पुढारी ऑनलाईन: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2021 वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूंची नामांकनं प्रसिद्ध केली आहेत. या आयसीसी पुरस्कारासाठी चार खेळाडूनां नामांकने जाहीर केली आहेत, त्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन, आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा मलान यांच्या नावाचा समावेश आहे.
शाकिब अल हसनने यावर्षी 9 सामन्यात 39.57 च्या सरासरीने 277 धावा केल्या आहेत. त्याने 17.52 च्या सरासरीने 17 बळी देखील घेतले आहेत. शाकिबने या वर्षाची सुरुवात जबरदस्त पद्धतीने केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. या मालिकेतून शाकिबने दोन वर्षांनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. 2019 मध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.
त्याचबरोबर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या वर्षात केवळ 6 एकदिवसीय सामने खेळले असले तरी त्याने संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. बाबरने यावर्षी 228 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सामनावीराचा पुरस्कार देखील मिळाला. बाबरच्या कामगिरीमुळे पाकिस्तानने ही मालिका 2-1 अशी जिंकली.
मलानबद्दल बोलायचे झाले, तर त्याने या वर्षी 8 सामने खेळले आणि 84.33 च्या सरासरीने 509 धावा केल्या. यामध्ये त्याने दोन अर्धशतके आणि दोन शतके झळकावली. मलानने 2020 मध्ये कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तो दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने यावर्षी 14 सामन्यात 79.66 च्या सरासरीने 705 धावा केल्या. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत स्टर्लिंगने आयर्लंडकडून सर्वाधिक २८५ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने दोन शतके झळकावली.
हेही वाचा: