सणबूर (सातारा) : पुढारी वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्यात असलेल्या एका गावात सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसांनी नराधम संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेने पाटणसह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Satara Crime)
दरम्यान, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी भेट देऊन पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी संशयितास फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टीने पोलीस योग्य तो तपास करून न्यायालयासमोर पुरावे सादर करतील असे सांगितले.
दरम्यान, या घटनेने रुवले- सुतारवाडीसह ढेबेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील रुवले-सुतारवाडी येथील पीडित मृत अल्पवयीन मुलगी काल (दि. २९) रोजी सायंकाळी बेपत्ता झाली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत संबंधित मुलीच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी तिचा शोध घेतला.
परंतु, ती सापडली नाही. गुरुवारी पहाटे ०२.३० वाजण्याच्या सुमारास रुवले- सुतारवाडी येथे घटनेतील पीडित मुलीच्या घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर ओढ्यात तिचा मृतदेह आढळून आला.
याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुरुवारी ३० रोजी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, कराड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर दुपारी गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी अल्पवयीन पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना घडलेली घटना दुर्दैवी असून संशयित नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा दृष्टीने पोलीस तपास करून न्यायालयासमोर पुरावे सादर करतील, असे सांगितले.