NMC पोलखोल : पाऊस आला धाऊन; डांबर गेले वाहून

नाशिक : पावसाला सुरुचात झाली असून रिमझिम पावसातच येथील रस्त्यांची दैना झाली असून नाशिककरांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक : पावसाला सुरुचात झाली असून रिमझिम पावसातच येथील रस्त्यांची दैना झाली असून नाशिककरांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. (छाया: हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रविवारपासून शहर व परिसरात बरसत असलेल्या रिमझिम पावसानेच महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीची पोलखोल केली आहे. महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून (एमएनजीएल) गॅस पाइपलाइनसाठी शहरातील रस्त्यांची पुरती दुर्दशा केली होती. रस्ते खोदाईचे काम तत्काळ थांबविले जावे तसेच खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नाशिककरांकडून केली गेल्यानंतर महापालिकेने खोदलेल्या रस्त्यांवर थिगळे बसविण्याचे काम केले. मात्र, रिमझिम पावसातच या थिगळांवर मोठमोठे खड्डे पडल्याने महापालिकेची पोलखोल झाली आहे.

एमएनजीएल कंपनीने घरोघरी गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई केली. त्यामुळे बहुतांश प्रशस्त रस्त्यांची दयनीय अवस्था झाली. नियम धाब्यावर बसवून बेभानपणे रस्ते खोदले गेल्याने नाशिककरांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाने पुढील चार महिने रस्ते खोदाई केली जाऊ नये, असे आदेश दिले. शिवाय खोदलेल्या रस्त्यांची तत्काळ डागडुजीही सुरू केली. मात्र, अत्यंत बेशिस्तपणे डागडुजीची कामे केले गेल्याने पावसाळ्यात नाशिककरांची वाट पुन्हा बिकट होईल, असा अंदाज वर्तविला जात असतानाच पहिल्याच रिमझिम पावसात तो खरा ठरताना दिसत आहे. डागडुजी केलेल्या बहुतांश रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना खड्ड्यातून वाट शोधावी लागत आहे. शिवाय रस्ते डागडुजी करताना मनपा प्रशासनाने दुतर्फाची माती उचलण्यास अजिबातच तसदी घेतली नसल्याने डागडुजी केलेले रस्ते चिखलात हरविले आहेत. यावर वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत असून, छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनाही समोर आल्या आहेत. महापालिकेच्या या गलथान कारभाराविषयी नाशिककरांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात असून, या कामातील टक्केवारीची चर्चा आता रंगत आहे.

मनपा मुख्यालय रामायणसमोरच खड्डे

नियम धाब्यावर बसवून रस्ते खोदाई केली असून, त्याची डागडुजीही तशाच बेशिस्तपणे केली आहे. मनपा मुख्यालयातील रामायण बंगल्यासमोरून जाणाऱ्या रस्त्यांची केलेली डागडुजी बेशिस्तपणाचे उत्तम उदाहरण असून, शहरातही काहीसे असेच चित्र आहे. रामायण समोरील डागडुजी केलेल्या रस्त्यावर खड्डे पडले असून, पुढे त्र्यंबकेश्वर रस्त्याचीही अशीच काहीशी स्थिती आहे.

नाशिककरांची वाट यंदाही बिकट

गेल्यावर्षी खड्ड्यांमध्ये रस्ता शोधणे नाशिककरांना अवघड झाले होते. यंदा त्यापेक्षाही बिकट स्थिती होण्याची शक्यता आहे. अगोदरच एमएनजीएल कंपनीने रस्ते खोदल्याने चांगल्या अन् सुसज्ज रस्त्यांची दैना झाली आहे. अशात पावसाने जोर पकडल्यास यंदाही नाशिककरांना खड्ड्यांमध्ये रस्ता शोधणे मुश्किल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news