कोल्हापूर : वन अमृत प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी निधी देऊ : दीपक केसरकर | पुढारी

कोल्हापूर : वन अमृत प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी निधी देऊ : दीपक केसरकर

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : वनपर्यटनासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून सह्याद्रीच्या संवर्धनासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीतून स्थानिकांच्या उपजिविकेच्या साधनासाठी अधिक निधी दिला जाईल. वनअमृत प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आर्थिक निधी उपलब्ध करू, असे आश्वासन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिले.

मानोली (ता. शाहूवाडी) येथे वन अमृत प्रकल्प व सह्याद्री रक्षण मोहीम लोकार्पण सोहळा आज त्यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धैर्यशील माने होते. प्रास्ताविक उपजिविका तज्ञ योगेश फोडे यांनी केले.  यावेळी केसरकर यांनी वनअमृत प्रकल्प हा कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीपणे राबविण्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करू असे सांगितले. मुलांच्या आरोग्य संवर्धनासाठी शालेय पोषण आहारात नाचणीचे सत्त्व देण्याचे धोरण त्यांनी यावेळी मांडले. खासदार धैर्यशील माने म्हणाले, वन अमृत प्रकल्प दहा गावांमध्ये यशस्वी झाला आहे. त्यांच्या माध्यमातून चारशे गावांना रोजगाराच्या प्रवाहात जोडले जाणार आहे. शाश्वत रोजगार आणि वनसंवर्धनाच्या मोहीमेसाठी नाविन्यपूर्ण वन अमृत प्रकल्पाचा विस्तार कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये नियोजनबद्ध करण्यात येत आहे. करवंद, जांभूळ, आंबा, फणस, काजू बोंड, कोकम, आवळा, द्राक्षे,  तांदूळ (स्थानिक वाण), नाचणी इत्यादी उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योग महिला बचत गटाद्वारे स्थापन करण्यात येतील. सह्याद्री पर्वतरांगातील जैवविविधता संवर्धन व जंगल भागातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी या प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार आहे. बचत गटाच्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

यावेळी मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम, उपवनसंरक्षक जी गुरू प्रसाद, तहसीलदार रामलिंग चव्हाण, ग्रा पं सदस्य राजश्री बागम, बचत गट अध्यक्षा राजश्री पाटील यांनी मनोगते व्यक्त केलीत. यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा अभियान व्यवस्थापक वनिता डोंगरे, विजय देसाई, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील, गटविकास अधिकारी रामदास बघे, सरपंच रामचंद्र पाटील प्रमुख उपस्थित होते. आभार वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा दळवी यांनी मानले.

संबंधित बातम्या

हेही वाचा : 

Back to top button