मावळातील पवना धरणात केवळ 17 टक्के साठा | पुढारी

मावळातील पवना धरणात केवळ 17 टक्के साठा

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जून महिन्या संपत आला तरी, अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. धरणात सध्या 17.67 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी संकट कायम आहे. यंदा जून महिना संपत आला तरी, पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. शनिवारी (दि.24) आणि रविवारी (दि.25) पावसाच्या सरी पडल्या. मात्र, तो समाधानकारक पाऊस नाही. पावसाळी वातावरण निर्माण होते. मात्र, पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. शेतकर्‍यांसह सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

शहराची तहान भागविणारे आणि पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेले पवना धरणातील साठा झपाट्याने कमी होत आहे. धरणात सोमवार (दि.26) पर्यंत 17.67 टक्के इतका साठा शिल्लक आहे. धरणाने तळ गाठल्याने धरणक्षेत्र मोठ्या प्रमाणात कोरडे पडले आहे. सध्याचा पाणीसाठा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात 18.88 टक्के इतका पाणीसाठा होता. पाऊस लांबल्यास तसेच, धरणाचा पाणीसाठा कमी होत असल्याने पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे.

जूनअखेरपर्यंत पावसाची वाट पाहणार

पवना धरणातील पाणीसाठा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. पाटबंधारे विभागाने पाणी कपात सुरू करावी, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेस अद्याप कळविलेले नाही. पाऊस लांबला आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाचा अंदाज घेऊन पाणीकपातीबाबत आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

पवना धरणातील पाणीसाठा
आज :
17.67%
गेल्या वर्षी : 18.88%

हेही वाचा

पुणेकरांनो सावधान ! स्वस्तातले गॅजेट्स पडतील महागात; बनावट बिल देऊन मोबाईल विक्री करणारी टोळी सक्रिय

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ३ जुलैला नाशिक दाैऱ्यावर

स्मार्ट लॉक करेल तुमच्या प्रवासी बॅगची सुरक्षा

 

Back to top button