

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय महिला आयोगाला (एनसीडब्ल्यू) महिला अत्याचाराच्या सुमारे ३१ हजार तक्रारी ( crimes against women ) गतवर्षी प्राप्त झाल्या. २०१४ नंतर तक्रारींचे हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. एकूण तक्रारींपैकी अर्ध्याहून अधिक तक्रारी एकट्या उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आल्या.
राष्ट्रीय महिला आयोगानूसार, २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये महिलांविरोधातील अत्याचाराच्या ( crimes against women ) तक्रारींमध्ये ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. एनसीडब्ल्यूच्या आकडेवारीनूसार ३० हजार ८६४ तक्रारींपैकी ११ हजार १३ तक्रारी महिलांच्या भावनात्मक शोषण लक्षात घेता त्यांना सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकारासंबंधी होती. घरगुती हिंसाचाराशी संबंधीत ६,६३३ तसेच हुंड्यासाठीच्या जाचासंबंधी ४ हजार ५८९ तक्रारी प्राप्त झाल्या.
सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात महिलांविरोधात गुन्ह्यांसंबंधी सर्वाधिक १५ हजार ८२२८ तक्रारी प्राप्त झाल्या. उत्तर प्रदेश पाठोपाठ दिल्ली ३,३३६, महाराष्ट्र १,५०४, हरियाणा १,४६०, तसेच बिहारमध्ये १ हजार ४५६ तक्रारी वर्षभरात मिळाल्या. २०१४ नंतर एनसीडब्ल्यू ला २०२० मध्ये सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या. २०१४ मध्ये ३३ हजार ९०६ तक्रारी मिळाल्या होत्या. आयोगाच्या कार्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यात आल्याने तक्रारींच्या संख्येत वाढ झाल्याचे मत एनसीडब्ल्यू प्रमुख रेखा शर्मा यांनी व्यक्त केले आहे. २०२० मध्ये जुलै ते सप्टेंबर दरम्यान महिन्याकाठी ३ हजार १०० हून अधिक तक्रारी मिळाल्या. नोव्हेंबर २०१८ मध्ये 'मी टू आंदोलन' चालवले जात असतांना ३ हजार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचलं का?