माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू; पीएम मोदींकडून शोक व्यक्त

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जम्मू; पुढारी ऑनलाईन

जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून १४ यात्रेकरू जखमी झाले आहेत. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्रिकुटा टेकडीवर असलेल्या मंदिराच्या गर्भगृहाबाहेर ही घटना घडली. आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैष्णो देवी भवनात नवीन वर्षाच्या प्रारंभानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गर्दी झाली तेव्हा चेंगराचेंगरी झाली.

चेंगराचेंगरीत १२ यात्रेकरू ठार आणि किमान १४ जण जखमी झाल्याची पुष्टी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि नित्यानंद राय यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.

पीएम मोदींनी चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. सर्व जखमींवर श्राइन बोर्डाकडून उपचार केले जातील, असेही राज्यपाल कार्यालयाने जाहीर केले आहे.

पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी माता वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे उद्भवलेल्या दुःखद परिस्थितीचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करत आहेत.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news