PM-KISAN : पीएम मोदींनी शेतकऱ्यांना दिली नवीन वर्षात भेट, बँक खात्यात २ हजार रुपये जमा | पुढारी

PM-KISAN : पीएम मोदींनी शेतकऱ्यांना दिली नवीन वर्षात भेट, बँक खात्यात २ हजार रुपये जमा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क

पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेचा (PM-KISAN) २ हजार रुपयांचा दहावा हप्ता आज शनिवारी (१ जानेवारी २०२२) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. सुमारे दहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २०,९०० कोटी कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करत पीएम किसान योजनेचा निधी जारी केला असल्याची माहिती दिली.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत (PM-KISAN) प्रत्येक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. वर्षाला तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे ही मदत दिली जाते.

पैसे खात्यात जमा झाले की नाही, याची खात्री शेतकरी ‘पीएमकिसान डॉट जीओव्ही डॉट इन’ या वेबसाईटवर करू शकतात.
या दरम्यान बोलताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे की, नवीन २०२२ वर्षात सुमारे २०,९०० कोटी रुपये १०.०९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून PM-KISAN योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा नववा हप्ता ऑगस्ट २०२१ मध्ये रिलीज करण्यात आला होता.

#PMKisan या योजनेअंतर्गत जारी केलेली एकूण रक्कम सुमारे १.८ लाख कोटींवर पोहोचली आहे. PM-KISAN योजनेची घोषणा फेब्रुवारी २०१९ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेचा पहिला हप्ता डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीसाठी होता.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : विवाह वय वाढल्याने महिला सबलीकरणाला बळकटी

 

Back to top button