बंगळूर : परीक्षा गैरव्यवहार, लाच प्रकरण : आयएएस, आयपीएस अधिकारी जाळ्यात

बंगळूर : परीक्षा गैरव्यवहार, लाच प्रकरण : आयएएस, आयपीएस अधिकारी जाळ्यात
Published on
Updated on

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी नेमणूक विभागाचे तत्कालीन एडीजीपी अमृत पॉल आणि जागा मालकीबाबत तंट्यामध्ये लाचप्रकरणी बंगळूर शहर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी जे. मंजुनाथ यांना अटक झाली आहे. परीक्षा प्रकरणात सीआयडी तर लाच प्रकरणात एसीबीने कारवाई केली.

संपूर्ण राज्यात खळबळ माजवलेल्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात नेमणूक विभागाचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक अमृत पॉल यांना सीआयडीने अटक करून चौकशी सुरू केली आहे. याद्वारे प्रथमच सीआयडीकडून या प्रकरणात एका आयपीएस अधिकार्‍याला अटक झाली आहे.

पीएसआय परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात याआधी अमृत पॉल यांना चारवेळा नोटीस बजावण्यात आली होती. सोमवारी ते चौकशीसाठी हजर झाले. सीआयडी अधिकार्‍यांनी दीर्घकाळ चौकशी करून त्यांना अटक केली. सध्या ते अंतर्गत सुरक्षा विभागाचे एडीजीपी म्हणून सेवा बजावत आहेत. याआधी ते नेमणूक विभागाचे एडीजीपी होते. पीएसआयच्या 545 जागा भरण्याच्या प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी नेमणूक विभागाचे डीवायएसपी शांतकुमार यांच्यासह काहीजणांना अटक करण्यात आल्याची माहिती सीआयडीने दिली आहे. पॉल यांना अटक केल्यानंतर त्यांची बाऊरिंग रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पहिल्या एसीएमएम न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले.

आपल्या सरकारने सर्वप्रथम पोलिस नेमणूक घोटाळ्याचा तपास केल्याने याविषयी अडचणीत येण्याचे कारण नाही. कोणत्याही सरकारने हे आव्हान स्वीकारले नव्हते. भाजपने हे आव्हान स्वीकारले. यामागील सत्य काय ते बाहेर येईल. कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही. सर्व आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

आयएएस मंजुनाथ अटकेत
जमीन व्यवहार प्रकरणात लाच घेतल्याप्रकरणी बंगळूर शहरचे तत्कालीन जिल्हाधिकारी जे. मंजुनाथ यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) सोमवारी अटक केली. बंगळूर शहराचे जिल्हाधिकारी असताना आनेकल तालुक्यातील कोडलू गावात 38 गुंठे जमिनीच्या मालकीचे प्रकरण त्यांच्याकडे आले होते. या प्रकरणात अर्जदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी त्यांनी 5 लाखांची मागणी अर्जदार आझम पाशा यांच्याकडे केली होती. याप्रकरणी पाशा यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एसीबी अधिकार्‍यांनी 21 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे व्यवस्थापक महेश आणि न्यायालय विभागाचे सहायक चेतन यांना अटक केली होती. मंजुनाथ यांनी महेश यांच्यामार्फत अर्जदाराकडे लाच मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या दोघांचे मोबाईलवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग करण्यात आले होते. ते अर्जदाराने एसीबीला सादर केले होते. त्यानुसार मंजुनाथ यांना अटक करण्यात आली.

पीएसआय नेमणूक प्रकरणात केवळ अधिकार्‍यांनाच जबाबदार धरू नये. यामध्ये गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र हेही कारण आहेत. मुख्यमंत्री बोम्मई यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे.
– सिद्धरामय्या,
विधानसभेचे विरोधी पक्षनेते

पोलिसांच्या नेमणुकीत भ्रष्टाचार प्रकरणी भाजपने सर्वप्रथम तपासाचा आदेश दिला. त्यामुळे घोटाळा उघडकीस येणे शक्य झाले आहे. याआधी घोटाळे झाले तरी तत्कालीन सरकारांनी तपास केला नव्हता.
– बसवराज बोम्मई,
मुख्यमंत्री, कर्नाटक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news