

जम्मू ः अनिल साक्षी : जैश-ए-महंमद आणि लश्कर-ए-तोयबा कडून जम्मूतील हिंदू मंदिरे टार्गेटवर असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर चा विशेष दर्जा रद्द केल्याच्या घटनेस ऑगस्टमध्ये दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर 5 ऑगस्टला जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होण्याच्या शक्यतेने जम्मू मध्ये हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मूतील हिंदू मंदिरे दहशतवाद्यांचे टार्गेट असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.
जैश-ए-महंमद आणि लश्कर-ए-तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना गेल्या काही दिवसांपासून जम्मूत दहशतवादी हल्ल्याचा कट रचत आहेत. त्यांच्या रडारवर जम्मूतील हिंदू मंदिरे आहेत. भाविकांची गर्दी असलेल्या हिंदू मंदिरांवर हल्ले करून त्यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या तयारीत दहशतवादी आहेत. त्यामुळे जम्मूत हाय अॅलर्ट जारी करण्यात आल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे.
आकाश साफ झाल्यानंतर पाकिस्तानी ड्रोननी पुन्हा जम्मूमध्ये घुसखोरी केली आहे.
गुरुवारी रात्री सांबा जिल्ह्यातील तीन ठिकाणी पाकिस्तानच्या ड्रोन्सनी भारतीय सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा प्रयत्न केला.
सूत्रांच्या माहितीनुसार, सांबा जिल्ह्यातील चिलयाडी, ब्राहमणा लष्करी तळ आणि सांदी गावातील इंडो-तिबेटियन पोलिसांच्या तळापासून 200 मीटर उंचीवर पाकिस्तानी ड्रोन टेहळणी करत असताना दिसून आले.
मावा या गावात रात्री पाकिस्तानी ड्रोन घुसले. सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारानंतर ते निघून गेले. स्थानिक तरुणांच्या माहितीनुसार, मावा पोलिस ठाण्यावर लाल रंगाची लाईट दिसली.
काहीवेळानंतर ते ड्रोन असल्याचे लक्षात आले. अरनिया खोर्यातील सीमावर्ती भागात गुरुवारी रात्री आठ वाजता ड्रोन दिसले.
आकाशात लाल आणि हिरव्या रंगाची वस्तू लोकांनी पाहिली.
तथापि, ते ड्रोन नसल्याचे सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे.
शुक्रवारी सकाळी सीमावर्ती भागात भारतीय लष्कारने शोधमोहीम सुरू केली.
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील खानपोरा पुलावर शुक्रवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर ग्रेनेड फेकले.
या हल्ल्यात चार जवानांसह एक नागरिक जखमी झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
सुरक्षा यंत्रणांनी परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली आहे.
जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश होण्यास 5 ऑगस्टला दोन वर्षे पूर्ण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर धार्मिक तेढ आणि दहशत निर्माण करण्यासाठीच हा हल्ला केल्याचे सुरक्षा दलाचे म्हणणे आहे.